विलास जळकोटकर
सोलापूर : धावपळीच्या जगात ताणतणावाला मूठमाती देऊन नियमित अन् वेळेवर आहार घ्या. दैनंदिन जीवनाचे वेळापत्रक सुरळीत ठेवा. उच्च रक्तदाबासारखी भेडसावणारी समस्या यातून आपोआप नाहिशी होईल. कोणत्याही आजाराचा बाऊ न करता त्याच्याशी सलगी करून नियमित औषधोपचार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ताणतणाव आपोआप टळेल. शरीर सुदृढ ठेवण्यास मदत होईल, अशा टिप्स देताना जीवनाचा मनस्वी आनंद लुटा, असा मौलिक सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी जागतिक उच्च रक्तदाब दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना दिला.
जगात २००० सालच्या नोंदीनुसार २६ टक्के नागरिक रक्तदाबाने ग्रस्त आहेत. २०२५ नंतर हे प्रमाण २९ टक्क्यांवर जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्तदाब हा आजार प्रामुख्याने वयाच्या चाळिशीपासून सुरू होतो. अर्थात त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनाही तो होतो. साधारणत: चक्कर येणे, डोके दुखणे, डोळ्याला दोन प्रतिमा दिसणे, शरीराला घाम सुटणे, बेशुद्ध होणे, फीट येणे ही साधारणत: ढोबळ कारणे असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल दडके यांनी सांगितले.
याशिवाय हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे म्हणतात.. १४०/९० पेक्षा जास्त रक्तदाब असणे याला हायपर टेन्शन किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असं म्हटलं जातं. रक्तदाब होण्याची मुख्य कारणे म्हणजे खूप जास्त काम, चिंता, राग, जेवणामध्ये मिठाचे, तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कडक होऊन जाणाºया रक्तवाहिन्या हे असते. जास्त वजन असणे, किडनीची रक्तवाहिनी बारीक असणे हे देखील रक्तदाब होण्याची कारणे मानली जातात.
शरीर सुदृढ ठेवायचे असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने औषधोपचाराबरोबरच आठवड्यातून किमान ५ दिवस दररोज अर्धा तास व्यायाम करणे गरजेचे आहे. वजन नियंत्रणात ठेवावे. आहारात जास्त मीठ वापरू नये. चरबीयुक्त तेलकट पदार्थ टाळावेत. योगा, प्राणायाम करावे, नियमित वेळेवर झोपावे अणि व्यसनापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वाचकांनी उच्च रक्तदाबापासून सावधान राहण्यासाठी योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रुग्णांनो प्रथम हे लक्षात घ्या अन् अंमल करा- रक्तदाब असणाºया रुग्णांनी पुढील बाबी वाचून दक्षता घेणे गरजेचे आहे. रक्तदाब नियमित केला नाही तर हृदय आघात (हॉट अॅटॅक), किडनी फेल होणे, रक्तवाहिन्या जाड, कठीण होऊन जाणे असे आजार होऊ शकतात. रक्तदाबाचे निदान झाले असेल तर डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर नियमित घ्यावीत. वजन जास्त झालेले असेल तर आपल्या उंचीप्रमाणे वजन कमी करावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित व्यायाम करावा. आपल्या खाण्यामध्ये मिठाचे, तेलाचे प्रमाण खूप कमी करावे. मांसाहार कमी करावा. चिप्स, लोणची, पापड, सॉस, चॉकलेट, आईस्क्रीम, केक आणि कोल्ड्रिंक्स घेऊ नयेत. नेहमी ताज्या भाज्यांचा वापर करावा. केळी, संत्री, नारळाचे पाणी, रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी चांगले असते. सूर्यफुलाचे तेल किंवा सोयाबीन तेल जेवणामध्ये वापरावे. मांसाहारामध्ये मासे खाण्यास परवानगी आहे. रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या आहारात गहू, तांदूळ, राळी, मका, अंकुरीत दाळी यांचा समावेश असावा, असा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय अंधारे यांनी रुग्णांना दिला आहे.
या तपासण्या करा...
- - मूत्रपिंड विकार तपासणी
- - शरीरातील चरबीचे प्रमाण
- - मधुमेह तपासणी
- - ईसीजी, थॉयरॉईडची तपासणी गरजेची
- - तरुण रुग्णाचा रक्तदाब वाढला तर त्याची होमोसिस्टीम तपासणी करावी.