विलास जळकोटकर
सोलापूर : मलेरिया अर्थात हिवतापाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने यंदा ‘माझ्यापासून सुरुवात करू, हिवतापाला दूर करू’ हे घोषवाक्य घेऊन राज्यभर आरोग्य विभागामार्फत जनजागरण मोहीम सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह विविध भागांमध्ये जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीसाठी आरोग्य यंत्रणा सरसावली आहे.
युनिसेफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात सुमारे १२०० मुले रोज मलेरियाने मृत्युमुखी पडतात. मलेरियावर मात करणे शक्य असले तरीही हा एक धोकादायक आजार ठरू शकतो. म्हणून त्याच्या लक्षणाची माहिती करुन घेऊन दक्षता बाळगावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.
अॅनोफिलिस (मादी) या जातीचा डास चावल्याने त्याच्याद्वारे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात व मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. ताप हे मलेरियाचे प्रमुख लक्षण मानले जाते. आपल्या घराच्या आसपास पाण्याचे डबके असेल तर विशेष काळजी घ्यायला पाहिजे. याशिवाय तीव्र डोकेदुखी जाणवायला लागते. थंडी-तापासोबत जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच मलेरियाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मलेरियाच्या रुग्णांना, वातावरण गार नसेल तरीही थंडी भरते. अशा वेळेस डॉक्टर्स रक्ततपासणीचा सल्ला देतात. त्याद्वारे मलेरियाचे नेमके निदान करता येते. मलेरियाची लागण झालेल्या रुग्णाला थंडी, हुडहुडी भरण्यासोबतच सतत घाम येण्याचे प्रमाणदेखील अधिक असते.
म्हणूनच मलेरियामुळे आरोग्याचे नुकसान होण्यापूर्वी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचारपद्धती अवलंबली पाहिजे, असा सल्ला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विठ्ठल धडके यांनी दिला आहे.इतर अनेक विकारांप्रमाणेच मलेरियामध्येही उलट्या होणे हे लक्षण प्रामुख्याने आढळून येते. या सर्वसामान्य लक्षणांप्रमाणेच अंगदुखी, खोकला ही लक्षणं आढळतात. म्हणूनच अधिक दिवस ताप अंगावर काढण्यापेक्षा वेळीच योग्य तपासण्यांमधून मलेरियाचे निदान करण्याची गरज आहे. डास हे मलेरियाचा प्रादुर्भाव होण्याचे मुख्य कारण असल्याने घर व घराजवळील परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. काही नैसर्गिक उपायांनीच डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी सजग राहायला हवे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात मलेरियाचं निदान करण्याची प्रणाली कमकुवत असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरातल्या मलेरियाच्या रुग्णांपैकी ६ टक्के रुग्ण भारतात आढळतात. जगभरातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ६ टक्के रुग्ण भारतात असून १०० पैकी फक्त ८ रुग्णांचंच निदान होतं.
जगभरातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण हे १५ देशांत आहेत. या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे, असे म्हटले आहे.
काय आहेत नैसर्गिक उपाय- नैसर्गिकरित्या डासांना दूर ठेवण्याचे काम निलगिरी व लिंबाचे तेल करते. या तेलामधील सिनिओलच्या घटकांमुळे त्वचेचे रक्षण होते. यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. याचबरोबर कापूरदेखील उपयुक्त मानला जातो. घरातील दारं-खिडक्या बंद करून कापूर जाळल्यास त्याचा धूर १५-२० मिनिटे घरात राहू दिल्यास डास पळून जाण्यास मदत होते. संध्याकाळच्या वेळी धूप करताना त्यात कापूर टाकला तरीही डास दूर होतात. तुळशीने अळ्या मारण्यास अत्यंत प्रभावी असल्याने ती डासांना दूर ठेवण्यास मदत करते. अशाच प्रकारे घराभोवती तुळस, पुदिना, गोंडा, गवतीचहा यासारखी झाडे लावल्यास तुमचे नैसर्गिकरित्याच डासांपासून रक्षण होईल, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हिवताप हा एका डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार आहे. या रोगाच्या प्रतिबंधाची सुरुवात स्वत:पासून करावी. यासाठी घरात डास येऊ नये, म्हणून खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. ‘हिवतापाला झिरो करू, स्वत:पासून सुरुवात करू,’ याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोहीम राबवण्यात येणार आहे.-डॉ. एकनाथ बोधले, जिल्हा हिवताप अधिकारी