मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
आपल्या मुलांनी शिकावं, आवडत्या खेळात प्राविण्य मिळवावे, आपलं नाव मोठे करावे या सदहेतूने कबाडकष्ट करत आपल्या मुलांला लागेल ते पुरवणाऱ्या पंक्चर काढणाऱ्याच्या सहा वर्षाच्या अथर्व देविदास आकळे या डोंगरगाव ( ता मंगळवेढा) येथील स्केटिंगपट्टूनें बेळगाव येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत सलग ८१ तास स्केटिंगचा नवा विश्वविक्रम नोंदवला आहे डोंगरगाव ( ता मंगळवेढा) येथील देविदास आकळे यांनी लॉकडाऊनमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुणे येथे गेले मात्र नोकरी मिळाली नसल्याने खचून न जाता टायर पंक्चर चे दुकान सुरू केले. पत्नीनेही शिलाई मशिनचे काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम सुरू ठेवले. मुलगा सहा वर्षाचा असून त्याला स्केटिंग ची आवड होती मात्र त्यासाठी प्रशिक्षण व त्यासाठी लागणारे साहित्य घेण्याचीही परिस्थिती नव्हती मात्र त्या दोघानी रात्रंदिवस कष्ट करून पैसे जमवून त्याला सर्व साहित्य घेतले, त्याची प्रशिक्षनासाठीची फी भरून त्याला सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले.
पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. अथर्वची मेहनत व जिद्द पाहून त्याची बेळगाव येथील स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ही स्पर्धा शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब व रोट्रॅक्ट क्लब बेळगाव यांनी २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत घेतली. यामध्ये महाराष्ट्र दिल्ली हरियाणा, मुंबई, कोल्हापूर, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, चेन्नई , यासह देशातून २१० खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये अथर्व आकळे यानें २०० मीटर स्केटिंग ट्रॅक वर रिले पद्धतीने स्केटिंग करत १० हजार ११६ फेऱ्या पूर्ण करत सलग ८१ तास स्केटिंगचा नवा विश्वविक्रम केला आहे.
या लहान खेळाडूची वेगवेगळ्या ९ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. देविदास आकळे यांनी अंत्यत गरीब परिस्थितीत मुलाला स्केटिंगचे प्रशिक्षण दिले. आई वडिलांच्या कष्टाचे फलित मुलगा राष्ट्रीय खेळाडू होण्याच्या रूपाने फेडत असेल तर नक्कीच ते आईवडील कृत्यकृत्य होत असतील. त्याची संघर्षाची कहाणी बघणाऱ्यांना मुलगा अथर्व चे हे यश बघून अक्षरश: डोळ्यात पाणीच तरळते आहे आमच्या गावासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. अशी भावना डोंगरगाव येथील दादासाहेब खिलारे यांनी व्यक्त केली.
अथर्व च्या कामगिरीची माहिती गावात कळताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला आहे.सर्व स्तरातून त्याच्या विक्रमी कामगिरीचे कौतुक होत आहे. भाजपा सरचिटणीस बिज्जू प्रधाने, पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीमंत आकळे , बँक ऑफ इंडियाचे दादासाहेब खिलारे यांनी यशाचे कौतुक केले ...................................अगदी लहान वयापासूनच स्केटिंग पट्टू होण्याची इच्छा मनात होती. त्यानं बालपणापासून स्केटिंग पट्टू होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. यानंतर अवघ्या सहाव्या वर्षी त्यानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. इतक्या लहान वयात अथर्व ने विश्वविक्रम केल्याने आमची दोघांची छाती अभिमानानं फुलली आहे.
---- देविदास आकळे , वडील डोंगरगाव, ता मंगळवेढा