सोलापूर : जागतिक रंगभूमी दिन यंदा कोरोनाच्या छायेमध्ये साजरा करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाट्यगृहाच्या ५० टक्के क्षमतेने रसिकांना प्रवेश दिला जात आहे. कोरोनाच्या भीतीने रसिकांनी पाठ फिरवल्यामुळे नाट्य व्यवसायाचे गणित कोलमडले. आता नाट्य व्यावसायिकांसमोर आर्थिक घडी बसविण्याचे मोठे आवाहन आहे.
मराठी रंगभूमी दिनानिमित्त (दि.५ नोव्हेंबर) नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र त्यात नाट्यगृहाच्या ५० टक्के प्रवेश क्षमतेची अट घालण्यात आली. यामुळे नाट्य व्यवसायाचे आर्थिक गणित कोलमडले. बाहेरची चांगली नाटकं सोलापूरमध्ये येऊ शकली नाहीत.
सध्या पुणे-मुंबई या शहरांमध्ये चांगली नाटके होत आहेत. कलाकार हे पुणे-मुंबई येथेच राहत असल्यामुळे त्यांना प्रवास व इतर खर्च करावा लागत नाही. जर ही मंडळी सोलापुरात आली तर त्यांचा राहण्याचा, जेवणाचा, प्रवासाचा अधिक खर्च होतो. त्यात नाट्यगृहाच्या ५० टक्के प्रवेशक्षमतेची अट असल्यामुळे निर्मात्यांना निम्माच परतावा मिळतो. यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वीप्रमाणे नाट्यगृह चालायचे असतील तर त्यांना पूर्णक्षमतेने नाट्यगृह चालवण्याची परवानगी मिळण्याची आवश्यकता असल्याचे रंगकर्मी व नाट्य व्यवस्थापक व निर्मात्यांनी यांनी सांगितले.
वर्षभरात फक्त दोन कार्यक्रम
शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे मागील वर्षात फक्त दोनच कार्यक्रम झाले. यात लावणी व एकपात्री प्रयोगाचा समावेश आहे. या दोन्ही कार्यक्रमांस चांगला प्रतिसाद मिळाला. नाट्यगृहाच्या पूर्ण क्षमतेने रसिकांना प्रवेश दिला तर आणखी चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या निर्बंधामुळे प्रेक्षक हा घरात बसून कंटाळाला आहे. प्रेक्षकांना चांगल्या कलाकृती पाहायची आहे. शासनाने अटी शिथिल केल्यास चांगली नाटके येतील. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
- गुरू वठारे, नैपथ्यकार
काही निर्बंध असले तरी पथनाट्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सादर करण्यात आले. बाहेर जाताना कोरूना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र घेऊनच आम्ही जात होतो. पथनाट्य सादर करताना फिजिकल डिस्टन्सचा नियम पाळण्यात आला. काही ठिकाणी प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाला.
- आशुतोष नाटकर, पथनाट्यकर, दिग्दर्शक