सोलापूर: पत्नीला प्रसूतिवेदना सुरू झाल्याने तिला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पत्नीची तब्येत नाजूक असल्याची माहिती पतीला कळाली; पण तेथील रूममध्ये पुरुषांना जाण्यास मज्जात होता. यामुळे तरुण चक्क बुरखा घालून पत्नीला भेटण्यासाठी डिलिव्हरी वॉर्डात गेला; पण ही बाब तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मौला नावाचा तरुण हा शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉकमधील डिलिव्हरी वॉर्डात गेला. तेथे जाण्यापूर्वी त्याने बुरखा घातला. आत जाताना सुरक्षा रक्षकाने त्यास हटकल्याने त्याने फक्त हातानेच पाण्याची बाटली देण्याचा इशारा करत आत गेला.
दरम्यान, गेल्यानंतर जवळपास पंधरा मिनिटे तो पत्नीजवळ थांबला. यावेळी तेथे असलेल्या डॉक्टरांनी संबंधित पेशंटचे नातेवाईक कोण आहेत, असा आवाज दिला. यावेळी बुरखा घातलेल्या मौला याने लगेच प्रश्नाला उत्तर दिले; पण बुरखा घातलेल्या महिलेचा आवाज हा पुरुषासारखा असल्याचा तेथील कर्मचाऱ्यांना जाणवले. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा संवाद साधल्यानंतर त्यांना शंका आली. यामुळे त्यांनी बुरखा काढताच मौलाचा बुरखा फाटला. महिला वॉर्डात पुरुष आल्याची माहिती लगेच सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आली. यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून सिव्हिल पोलिस चौकी पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकांकडे झाली आहे.
यामुळे बुरख्याला मिळाली परवानगी-
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉक मधील प्रसूती विभागात याअगोदर बुरखा घालून प्रवेश करण्यास प्रतिबंधित करण्यात आले होते; पण काही महिलांनी याबाबत अधिष्ठातांना भेटून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बुरखा घातलेल्यांना परवानगी देण्यात येत होती.
मुलीचा झाला मृत्यू-
तीन दिवसांपासून बायकोला न भेटल्याने बायकोच्या चिंतेपोटी तिला भेटण्यासाठी तो तरुण बुरखा घालून हॉस्पिटलमध्ये गेला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याच्या मुलीचे हृदयाचे ठोके कमी झाल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. सायंकाळी पावणे सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
तो चक्क मुली सारखाच चालला-
मौला याने आपल्या नातेवाइकांसमोर लिफ्टमध्ये बुरखा घातला. बाहेर आल्यानंतर तो हळूहळू चालत थेट प्रसूती विभागाकडे गेला. तेथे जाताना त्याने बायकी चालच ठेवली. यामुळे कोणालाही शंकाच आली नाही. शिवाय बुरखा पूर्ण डोक्यापासून ते पायापर्यंत घातलेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.