सोलापूर : दिवसेंदिवस पेट्रोलचे वाढते दर आणि प्रदूषणावर चांगला उपाय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापराकडे शहरातील नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे. या वाहनांच्या खरेदीवर जीएसटी, नोंदणी तसेच अन्य चार्जेसमध्ये सूट देण्यासह सरकार वाहन खरेदीकरिता अनुदानदेखील देत आहे. त्यामुळे शहरात ६ चारचाकी, ७०५ दुचाकी आणि ३१ ई-रिक्षा अशी एकूण २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत शहरात ७४२ इलेक्ट्रिक वाहने धावत आहेत.
केंद्र सरकारने देशाला सन २०३० पर्यंत ‘इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन’ करण्याचे ध्येय ठेवले आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच त्यांचा स्पीड कमी असल्यामुळे अपघात कमी होतील. वाहनचालकांनी सर्वाधिक पसंती दुचाकीला दिली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये विजेवर चालणाऱ्या कारपेक्षा दुचाकीला प्राधान्य दिले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून बाजारात विजेवर धावणाऱ्या वाहनांकडे पाहिले जात आहे. ही वाहने पर्यावरणपूरक आहेतच; पण त्यांचा इंधनखर्चही कमी आहे. या वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही तुलनेने कमी आहे. त्यामुळे या वाहनांच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत चालला आहे. परंतु अनेक शहरांमध्ये विद्युत वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग केंद्रांची सुविधा उपलब्ध नसल्याने खरेदीदारांचा उत्साह कमी होत आहे.
---
शहरातील चार्जिंग सेंटर
सध्या शहरात सोलापूर महानगरपालिका आणि साखर पेठेत चार्जिंग सेंटर सुरू असून येत्या काळात सात रस्ता आणि पुणे नाका येथे चार्जिंग सेंटर उभारली जाणार आहेत, अशी माहिती सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून मिळत आहे.
----
दुचाकींना प्राधान्य
अद्याप शहरात दुचाकी ७०५ विजेवर चालणाऱ्या कारपेक्षा दुचाकीला चार्जिंग करण्यासाठी कमी विद्युतपुरवठा आणि वेळ लागतो. घरातही दुचाकी सहज चार्ज करता येते. तसेच एकदा दुचाकी चार्ज केल्यास ५० ते ८० किलोमीटरपर्यंत धावते. दुचाकी सहज चार्ज करता येत असल्याने दुचाकी खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा आहे.
---
राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांविषयी धोरण जाहीर केले आहे. वाढता इंधनखर्च आणि इंधनामुळे होणारे प्रदूषण यांवर उपाय म्हणून पाहिल्या जात असलेल्या विजेवर चालणाऱ्या (इलेक्ट्रिक) वाहनांना अलीकडच्या काळात मागणी वाढली आहे.
- विजय तिराणकर, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
----