आप्पासाहेब पाटील
सोलापूर : रेल्वेत मोबाईल चोरीला गेला, बॅग विसरली किंवा अन्य वस्तूंची चोरी अथवा गुन्हा घडल्यास प्रवाशांना आता प्रवास खंडित करून पोलीस ठाणे गाठण्याची गरज नाही. कारण आता रेल्वेत असणारे तिकीट तपासणी अधिकारी (टीसी)च गुन्हा दाखल करून घेणार आहेत. याकामी लोहमार्ग पोलीस अन् रेल्वे सुरक्षा बलाचे जवान मोठी मदत करणार आहेत.
पोलिसांकडे दररोज मोबाईल चोरीच्या असंख्य तक्रारी दाखल होतात. मोबाईल चोर हे सामान्यपणे महिला व ज्येष्ठ नागरिकांना आपली शिकार बनवतात. कारण त्यांच्याकडून प्रतिकाराची शक्यता कमी असते. मोबाईल चोरी होण्याचा धोका टाळण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांना विविध उपक्रम, जनजागृती, प्रचार, प्रसाराव्दारे जागृत करण्याचे काम केले जाते. दरम्यान, प्रवाशांचा मोबाईल किंवा अन्य वस्तू चाेरीला अथवा आणखीन काही गुन्हे घडल्यास प्रवास खंडित न करता रेल्वेतच तिकीट तपासणी अधिकारी गुन्हा दाखल करतील अन् तो रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करतील असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.
-------------
प्रवाशांना अशी देता येईल तक्रार...
जर एखाद्या प्रवाशाचा मोबाईल हरवला, चोरीला गेला, बॅग हरवली अथवा अन्य काही तक्रार किंवा गुन्हा घडल्यास संबंधित रेल्वेतील तिकीट तपासणी अधिकारी (टीसी) यांच्याकडून टीटीई (TTE) फॉर्म घेऊन तो भरून द्यावा. तिकीट तपासणी अधिकारी तो फॉर्म संबंधित रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडे देतील. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गुन्हा दाखल करून तो लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करतील. लोहमार्ग पोलीस त्या घटनेचा शोध करून तपास पूर्ण करतील.
----------
प्रवाशांनो मदतीसाठी १८२ वर संपर्क करा...
रेल्वे प्रवासात चोरी, दरोडा अन्य घटना घडल्यास प्रवाशाने त्वरित १८२ या रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करावा. संपर्कानंतर तत्काळ संबंधित रेल्वे एक्सप्रेसमधील रेल्वेचे पोलीस प्रवाशांच्या मदतीसाठी येतील. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती घेऊन शक्य तेवढी मदत प्रवाशांना रेल्वे पोलीस करतील.
-------------
देशात कुठेही तक्रार दाखल करता येणार
मोबाईल व अन्य चोरीच्या घटना किंवा इतर गुन्हा घडल्यास संबंधित तिकीट तपासणी निरीक्षकाकडे आपली तक्रार नोंदविता येणार आहे. कोणत्याही राज्यातील कोणत्याही रेल्वे प्रवाशाला कुठेही तक्रार दाखल करण्याची ही सुविधा आहे.
---------
प्रवाशांना प्रवास खंडित न करता आपल्या मोबाईल, बॅग व अन्य चोरीच्या घटनांविषयी रेल्वेतील तिकीट तपासणी अधिकाऱ्याकडे तक्रार करता येते. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेकदा अडचणी येतात. कोणतीही समस्या असेल तर १८२ या क्रमांकावर संपर्क करा. या क्रमांकावर तक्रार केल्यानंतर लगेचच्या स्थानकावर लोहमार्ग किंवा आरपीएफचे जवान प्रवाशांच्या मदतीस येतात.
- अमोल गवळी, पोलीस निरीक्षक, सोलापूर लोहमार्ग पोलीस