महेश कुलकर्णी
सोलापूर : कुणी झाड तोडायला लागले तर झाडाला लावलेल्या क्यू. आर. कोड प्रणालीतील सेन्सर तातडीने मोबाईलवर मेसेज पाठवेल अन् वृक्षतोड रोखली जाईल...हे अनोखे संशोधन केले आहे माढा तालुक्यातील परितेवाडी येथील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी. त्यांच्या अराऊंड दी वर्ल्ड या प्रकल्पाला आता अमेरिकेच्या नॅशनल जिओग्राफिकचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या प्रकल्पाव्दारे डिसले यांनी माढा तालुक्यातील आकुंभे या गावातील झेडपी शाळेची निवड केली होती. याअंतर्गत गावाचे एनव्हायर्नमेंट रिपोर्ट कार्ड तयार करून पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्धता आणण्यासाठी व्यापक कृती कार्यक्रम राबवला गेला. गावातील एकूण झाडांची संख्या, गावचे एकूण क्षेत्रफळ, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या, आदी माहिती संकलित करून ३३ टक्के वनक्षेत्र निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान वापरण्यात आले.
गावातील जुन्या झाडांची कत्तल होऊ नये, याकरिता त्या झाडांवर क्यूआर कोड टॅग लावण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून या प्रकल्पावर काम चालू आहे. यामुळे गावातील पूर्वी २६ टक्के असलेले वनक्षेत्र आता ३३ टक्के इतके झाले आहे. कुठल्याही शहरात किंवा गावातील वनक्षेत्र हे कमीत कमी ३३ टक्के असावे लागते. क्यूआर कोडचा वापर व्यापक स्वरूपात करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डिसले यांनी झाडे वाचविणे आणि जगविण्यासाठी आकुंभेतील सर्व झाडांची गणना केली. ५४६ झाडे येथे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला १० या प्रमाणे सर्व झाडे दत्तक देण्यात आली.
ए, बी, सी आणि डी अशी वर्गवारी केली. या सर्व झाडांवर क्यूआर कोड प्रणालीद्वारे टॅग बसविले आहेत. यातील ‘डी’ वर्गातील वृक्षाला सेन्सर बसविण्यात आले आहेत. सेन्सरमुळे झाडाला क्षती पोहोचवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास सेन्सरद्वारे दत्तक विद्यार्थ्यांच्या वडिलांना मोबाईलवर मेसेज येतो. यामुळे वृक्षतोड रोखली जाऊ शकते. त्याचबरोबर इतर कोटी वृक्षतोड केली तर त्याच्या घरी जाऊन पाच रोपे देण्याची अनोखी गांधीगिरीही करण्यात येणार आहे.
आम्ही केलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. अशा प्रकारचा प्रयोग प्रत्येक तालुक्यातील पाच गावांमध्ये राबविण्यासाठीचे पत्र मी झेडपीच्या सीईओंना दिले आहे. त्यांनी मान्यता दिल्यास ५५ गावांत असा प्रयोग सुरू करण्यात येईल.- रणजितसिंह डिसले,तंत्रस्नेही शिक्षक.