मरवडे येथे एकमेव शिल्लक खुली जागा वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध करून न देता संरक्षित करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समितीच्या आवारात धरणे आंदोलन करण्यात आले. त्या परिसरातील महिलांनी सार्वजनिक शौचालयाची गरज पूर्णतः संपलेली नसून पावसाळ्यात अनेक कुटुंबातील शौचालयाचे शोषखड्डे पांढऱ्या मातीमुळे निकामी होतात. त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त शौचालय उभारण्यात यावे, ही मागणी निवेदनाद्वारे महिलांनी केली आहे. यावेळी माजी सरपंच ताईबाई मासाळ, विद्यमान सदस्या मालन मणेरी, दीपाली ऐवळे, प्रियंका पवार यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. याबरोबरच मरवडे येथील मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळानेही ती जागा दर्ग्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकास करण्यासाठी संरक्षित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी माजी सभापती भारत मासाळ, सरपंच अशोक पवार, दादासाहेब पवार, धन्यकुमार पाटील, डॉ. माणिक पवार, प्रा. राजेंद्र पोतदार, रजाक मुजावर, महादेव मासाळ, प्रा. संतोष पवार, अमोल घुले, अशोक जाधव, दत्तात्रय जगताप, अल्लाबक्ष इनामदार, बाबू बनसोडे, संग्राम सप्ताळ, पैगंबर मुजावर, सावता दत्तू यांनी यावर चर्चा केल्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांनी तातडीने हे अतिक्रमण काढून घेण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांना दिल्याने या आंदोलनाची सांगता झाली.