अनिल पाटील यांची स्वत:ची शिरापूर येथे शेती असून, त्यांनी केळीची लागवड केली होती. कोरोनामुळे केळीला हमीभाव जादा न मिळाल्याने ४ लाख ५०,००० रुपयांचे नुकसान होऊन ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे त्यांच्या दोन एकरांत गांजाच्या झाडांची लागवड करण्यास परवानगी मिळावी याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी अर्ज केल्याचे मोहोळचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले. त्याअनुषंगाने पाटील यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. मागील केळीच्या पिकामध्ये नुकसान झाल्याने त्यांनी नैरश्यातून हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले. गांजाची लागवड करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहीत आहे. गांजाची लागवड करणार नाही. तसचे मोहोळ तहसीलदार राजशेखर निंबारे यांनी शेतीच्या मालास हमीभाव जादा मिळावा याकरीता महाराष्ट्र शासन यांना पत्र व्यवहार करणार असल्याचे सांगितल्याने मन परिवर्तन झाले आहे. ते कोणत्याही परिस्थतीत गांजाची लागवड करणार नसल्याचा लेखी जबाब पाटील यांनी दिला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.
गांजा लागवड करणार नसल्याचा दिला लेखी जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:26 AM