सोलापूर: नागपूर येथील डॉ.अश्विनी देहाडराय यांनी चितमपल्ली यांच्या साहित्याचे अध्ययन करून ' मारुती चितमपल्ली एक अध्ययन ' हा ग्रंथ लिहिला आहे. तो नागपूर येथील साहित्य प्रसार केंद्राने प्रसिद्ध केला आहे. या ग्रंथाची पहिली प्रत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना शनिवारी सोलापुरात प्रदान करण्यात आली.
डॉ. देहाडराय नागपूरहून खास सोलापूरला आल्या अन त्यांनी ही प्रत दिली. यावेळी निसर्ग साहित्याचे आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.सुहास पुजारी यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी चितमपल्ली म्हणाले, " माझ्या साहित्याविषयीचे महत्त्वपूर्ण अध्ययन आणि संशोधन प्रा. डॉ. पुजारी यांनी केले. त्यानंतर माझ्या संपूर्ण निसर्ग लेखनाचे अध्ययन, संशोधन अनेक अभ्यासक करीत आहेत, त्यावरील ग्रंथही ते प्रकाशित करीत आहेत, याचे समाधान आहे."
यावेळी डॉ. अश्विनी देहाडराय यांनी आपल्या अध्ययनाचा अनुभव कथन केला. अरण्यऋषी चितमपल्ली यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये निसर्ग, पर्यावरणाविषयीची आस्थेने चर्चा झाली.