सोलापूर शहर वस्तीत होणारा हा दुसरा मोठा रेल्वे बोगदा आहे. रामवाडी बोगद्याप्रमाणेच साडेपाच मीटर उंचीचा हा बोगदा होणार असून, वर्षभरात हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे रुळाखालून जड वाहतूक सुरू होणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यानचा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण व प्रदूषण कमी होणार आहे. विजयपूर, मंगळवेढा रोडने सोलापुराबाहेर जाण्यासाठी आलेली जड वाहतूक या मार्गे जुना पुणे नाका येथील छत्रपती संभाजी चौकमार्गे पुणे व हैदराबाद महामार्गाला जोडली जाणार आहे. यामुळे आता या परिसरातील १ हजार एकर जमीन विकसित होऊन महापालिकेचे उत्पन्न वाढणार आहे.
२० वर्षांचा इतिहास
मंद्रुप—मोहोळ बायपास होण्याआधी विजयपूरहून पुण्याकडे जाणारी सर्व जड वाहतूक शिवाजी चौकमार्गे मोहोळकडे जात होती. यामुळे वाहूक कोंडी, प्रदूषण व अनेकांचा बळी गेला होता. माजी महापौर मनोहर सपाटे व बिल्डर पंधे यांनी जड वाहतूक बाहेरून काढण्यासाठी सन २००० मध्ये या रस्त्याची संकल्पना मांडली. सुरुवातीला हा रस्ता ६० मीटर चार पदरी होता; पण काही शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे रस्ता ५४ मीटर करण्यात आला.
---
असा आहे या रस्त्याचा मार्ग
२०११ मध्ये शासनाकडून या रस्त्याला मंजुरी मिळाली अशी माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. २ कोटींचा निधी मिळाल्यानंतर जुना पुणे नाका ते रेल्वे रुळापर्यंत रस्ता तयार करण्यात आला. यामुळे या परिसरात वसाहती वाढल्या. रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पूल कोणी बांधायचा, हा वाद निर्माण झाला. शेटे वस्ती, देशमुख वस्ती, मंगळवेढा रोड, प्रतापनगरपर्यंत हा रस्ता आहे.
---
अन् रेल्वेला दिले पैसे
तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार व अविनाश ढाकणे यांनी या रस्त्याच्या कामाला गती दिली. शहरात नगरोत्थान रस्त्यासाठी मोठा निधी आला होता. भूसंपादनामुळे जे रस्ते होऊ शकत नाहीत ते रस्ते रद्द करून १९ कोटी ५० लाख रुपये रेल्वेला वर्ग करण्याचा निर्णय ढाकणे यांनी घेतला. २०१९ मध्ये रेल्वेने पुल बांधण्याची निविदा काढली. मात्र कोरोना साथीमुळे प्रक्रिया लांबली, पण आता काम सुरू झाले आहे.