कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच गेल्याने यंदा शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले, तेही काही काळच सुरू राहिले. त्यातही पालकांची मानसिकता होईपर्यंत कोरोनाचे पुनरागमन झाले. शिक्षकांनी दहावीचे महत्त्वाचे वर्ष असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग पुन्हा वाढल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा रद्द निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील ५ हजार ७६३ विद्यार्थी दहावीची परीक्षा न देताच पास झाले आहेत.
शाळेतीस अभ्यासक्रम आणि ऑनलाइन अभ्यासक्रम यात बरीच तफावत असल्याने ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांच्या किती पचनी पडले, याचे काहीच मूल्यमापन नाही. आता तर मूल्यमापनाची संधीही हिरावली गेली आहे.
मुलांची गुणवत्ता चिंतेची बाब
सध्या कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या एवढी वाढली की, आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची भीती आहे. त्यामुळे या काळात परीक्षा होत नसल्याचा पालक व मुलांनाही आनंद होत आहे. मात्र, मुलांची गुणवत्ता ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. पालकांना ऑनलाइन शिक्षणात मुले कुठे आहेत, याची चिंता वाटत आहे. यंदा कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्यच उरले नाही.