मंगळवेढा : रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून अंदाजे अंकावर पैशाची पैज लावून कल्याण मटका घेत असताना मंगळवेढा पोलिसांनी धाड टाकून जुगार साहित्यासह रोख ५,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
९ सप्टेंबर रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास येड्राव गावच्या रस्त्यावर एका टपरीच्या आडोशाला जुगार सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना मिळाली. त्यांच्या पथकाने धाड टाकली असता, या कारवाईत आप्पा केंगार (रा. मरवडे), संतोष बाबासाहेब कोरे (रा. मल्लेवाडी), प्रकाश राचाप्पा हलगंडे (रा. जवळा), किशोर प्रचंडे (रा. मंगळवेढा) हे चौघे आढळून आले.
त्यानंतर दुसरी कारवाई ही मरवडेत झाली. मरवडेत जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी येड्राव गावाकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या टपरीच्या आडोशाला जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी आरोपी प्रकाश हालगंडे व किशोर प्रचंडे हे दोघे संगनमताने रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून अंदाजे आकड्यावर पैशाची पैज लावून कल्याण मटका घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत २,०२० रुपयांची रोकड व जुगार साहित्य मिळून आले.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी अभिजित साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे.