सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोलापुरातूनही जॅकेट पाठविण्यात आली आहेत. भले त्याचे कापड हातमागावरचे नसेल. आम्ही पाठविलेल्या जॅकेटचे फोटो काँग्रेस कार्यकर्त्यांना दाखवायला तयार आहोत, अशा प्रतिक्रिया भाजपाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केल्या. एकूणच मोदी यांच्या जॅकेटवरुन मात्र सोलापुरातील राजकारण तापले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना सोलापुरातील विणकामाचा उल्लेख करून सोलापुरातून जॅकेट पाठविण्यात येत असल्याचेही म्हटले होते. या विधानाची माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी खिल्ली उडविली होती आणि मोदींचे सोलापुरी जॅकेट शोधा, असे आवाहनही केले होते.
याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या वेळी सोलापुरात आले तेव्हा मी त्यांना जॅकेट दिले आहे. आजवर मी त्यांना चार जॅकेट दिली आहेत. अहमदाबाद येथील त्यांच्या टेलरकडून मी जॅकेटचे माप घेतले होते. मोदींसाठी माझ्याकडे एक जॅकेट तयार असतेच. परवा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कार्यक्रमासाठी मी गुजरातमध्ये गेलो होतो तेव्हाही माझ्याकडचे जॅकेट देण्याचा मी प्रयत्न केला होता. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव मला त्यांची भेट घेता आली नाही. शिर्डी येथे बोलताना त्यांनी सोलापुरातून जॅकेट मिळत असल्याचा उल्लेख केला. तो माझाच संदर्भ असेल, असे मला म्हणता येणार नाही. सोलापुरातून कुणी दुसºयांनी जॅकेट दिले याबद्दलही फारशी चर्चा नाही. मी पाठविलेल्या जॅकेटचे कापड हातमागावरचे नसते, पण खादी आणि लिननचे असते. माझ्याकडं त्याचे फोटोही आहेत. काँग्रेस काय कुणालाही मी ते दाखवू शकतो.
सुशीलकुमार शिंदेंनी दिले होते जॅकेटविषयी आव्हान- शिर्डी येथील साई संस्थानच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातून हातमागावर विणलेले जॅकेट मिळत असल्याचा उल्लेख केला. दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ च्या सदिच्छा भेटीत त्यांनी ‘असे जॅकेट इथं कुठं मिळते’, असा सवाल करीत त्यांनी सोलापूरकरांनी आता या जॅकेटच्या दुकानाचा शोध घ्यायला हवा, असे खोचक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.