आप्पासाहेब पाटील, सोलापूर : पवित्र महिना म्हणून समजल्या जाणाऱ्या निज (नियमित) श्रावण महिन्यातील आज पहिला श्रावणी सोमवार. पहिल्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या योगसमाधीची सजावट कर्नाटकातील चिकबालापूर येथून विविध फुलांनी करण्यात आली आहे. दरम्यान, नागपंचमीचे औचित्य साधून मेघडंबरीतून नागदेवतेचे दर्शनही भाविकांना होत आहे. आज सकाळपासूनच दर्शनासाठी हजारो भाविकांची मंदिरात गर्दी झाली आहे.
सिद्धरामांनी जिथे संजीवनी समाधी घेतली, त्या योगसमाधीची श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आकर्षक फुलांची सजावट आणि मेघडंबरी उभी करण्यात आली. सजावटीसाठी ५०० किलो शेवंतीची (पांढऱ्या आणि निळ्या) फुलं, साडेतीनशे किलो झेंडूची (पिवळा अन् केसरी) फुलं तर ५० किलो गुलाबाची फुलं लागली. शुक्रवारी दुपारपासून १५ कामगार या सजावटीच्या कामाला लागले होते. मंजूनाथ तेलसंग यांच्या भारत फ्लॉवरच्या माध्यमातून रविवारी मध्यरात्री नागदेवतेची प्रतीकात्मक असलेल्या मेघडंबरी उभी करण्यात आली. या सजावटीत महादेवाची पिंंड, त्रिशूळ आणि ओमनम् शिवायचा समावेश करण्यात आला आहे.