सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाबरोबर कुंभारकन्येचा झालेला विवाह... याच विवाहाचे स्मरण दरवर्षी होणाºया यात्रेत भाविकांना होताना दिसते. यात्रेत ज्या पवित्र योगदंडास महत्त्व आहे तो योगदंड वर्षातील एक दिवस मंदिराच्या गाभाºयात असलेल्या श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीजवळ तर इतर ३६४ दिवस मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या देवघरात ठेवून त्याचे पावित्र्य जोपासले जाते.
सोमवारी अक्षता सोहळा पार पडल्यावर मंगळवारी हळदी काढण्याचा कार्यक्रम पार पडला. मानाच्या सातही नंदीध्वजांसह योगदंड आणि गाभाºयातील मूर्तीस करमुटगी लावण्यात आले. नंदीध्वज आणि योगदंडास तलावात गंगास्नान घालण्यात आले. वर्षातील एक दिवस म्हणजे होमप्रदीपन सोहळ्यादिवशी हिरेहब्बू यांच्या घरातील योगदंड सन्मानाने मंदिरात आणले जाते. करमुटगी लावून गंगास्नान घातल्यावर योगदंड गाभाºयातील मूर्तीजवळ ठेवून विधिवत पूजन केले जाते.
वर्षातील एक दिवस गाभाºयातील मूर्तीजवळ योगदंड ठेवला जातो. इतर ३६४ दिवस योगदंड आपल्या घरातील देवघरात असतो. वर्षभर या योगदंडाचे नियमित पूजे करताना त्याचे पावित्र्य जोपासण्याचे काम होताना एक मनस्वी आनंदही मिळतो.- राजशेखर हिरेहब्बू, मानकरी.