राकेश कदम
सोलापूर : माझे शालेय शिक्षण पुण्यातील सेंट पॅट्रिक्स स्कूलमध्ये झाले. वर्गातील अनेक मुलांचे वडील, नातेवाईक परदेशात स्थायिक झालेले किंवा परदेशात व्यवसाय करणारे होते. ती मुलेही परदेशातच स्थायिक होणार असल्याचे सांगायची. माझ्याही मनात परदेशात स्थायिक होण्याची भावना निर्माण झाली होती. पण, ‘तू शेतकºयाचा मुलगा आहेस. तू शेतकºयांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे’, असे फादर फर्नांडो यांनी एकेदिवशी सांगितले. हे शब्द माझ्या मनाला भिडले.. अन् मी परदेशात स्थायिक व्हायचा विचार बदलून प्रशासकीय सेवेत यायचे ठरविले. हे सांगताना मनपा आयुक्त दीपक तावरे शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत होते. त्यांचे डोळेही पाणावले होते.
फादर फर्नांडो, मावशीने दिले जीवनमूल्यांचे शिक्षणबारामती तालुक्यातील माळेगाव हे माझे मूळगाव. बालवाडीत असताना माझी मावशी कमल पाटील यांनी मला शिक्षणासाठी पुण्यात आणले. मावशीचे पती १९६२ च्या युद्धात शहीद झाले होते. पुण्यात तिला घर मिळाले होते. मावशीच्या तीन मुलींसोबत माझेही शिक्षण सुरू झाले. मावशी शिक्षिका होती. तिने मला जीवनमूल्यांचेही शिक्षण दिले. त्यावरच माझी वाटचाल सुरू झाली. १२ वी झाल्यानंतर मला बीसीएसला प्रवेश मिळाला होता. पण फादर फर्नांडो यांचा तो संदेश लक्षात असल्याने मी बीसीएसऐवजी पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९९२ ते ९६ या काळात मी आयकर अधिकारी होतो. आता मी आयकर उपायुक्त असतो. मला राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेत यायचे होते. आयकर अधिकाºयाचे वेगळेच स्थान असते. प्रशासनात गेलास तर राजकीय लोक छळत राहतील, असे मला लोक सांगायचे. पण माझे ध्येय निश्चित होते. १९९६ साली सहकार विभागात रुजू झालो. त्यानंतर मी आयएएस झालो.
एक चांगला माणूस हो...फादर फर्नांडो आणि शिक्षिका असलेल्या माझ्या मावशीने मला एक चांगला माणूस हो, असा संदेश दिला. स्व. विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मी त्यांच्याकडे कार्यरत होतो. सहकार विभागात अनेक ठिकाणी काम केले. पण जीवनमूल्यांशी तडजोड करायची नाही, हे ठरविल्याने मला कुठली अडचण आली नाही. महाविद्यालयीन जीवनात आलेल्या प्राध्यापकांकडून मला खूप शिकायला मिळाले.
माझ्या कुटुंबीयांनी, मावशीने आणि शिक्षकांनी मला जीवनमूल्यांचे शिक्षण दिले. आयकर अधिकारी म्हणून पुण्यात रुजू झालो तेव्हा शासकीय घर मिळाले. तेव्हा फिलिप्स कंपनीने दरमहा एक हजार रुपये भरून वस्तू विकत घेण्याची एक स्कीम काढली होती. या स्कीममधून मी एक टेपरेकॉर्डर, टीव्ही, फ्रीज घेतले. एकेदिवशी मावशी घरी आली. एकाच वेळी एवढ्या वस्तू कशा काय आणल्यास. काही वाईट काम तर तू करीत नाही ना, असा जाब तिने विचारला. मी स्पष्टीकरण दिले. या संस्कारामुळेच मी आजवर चुकीच्या गोष्टींना स्पष्टपणे विरोध करत आलोय. शिक्षक, कुटुंबीयांनी दिलेल्या या संस्कारांमुळे मी पारदर्शी कारभार करीत आलो.