एक महिन्यापासून पंढरपूर तालुक्यात जवळपास १२ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. १४० पेक्षा जास्त नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ही प्रशासकीय आकडेवारी असली तरी या आकडेवारीशिवाय घरोघरी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण, बाधित रुग्ण, संशयित रुग्णांची संख्या वेगळी आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाकडून सध्या ४५ वर्षांपुढील वयोगटातील नागरिकांना युद्धपातळीवर लसीकरण देण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे सध्यातरी चित्र आहे. दर दोन दिवसाला पंढरपूर तालुक्यासाठी ३०० पेक्षा अधिक लसीकरणासाठी डोस येत असतात. त्यासाठी लसीकरण केंद्रावर अधिकृत नोंदणी करून ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगट असलेले नागरिक रात्री २ ते ३ वाजल्यापासून रांगेत उभे असतात. मात्र सकाळी २०० नागरिकांना लसीकरण केल्यानंतर लसीचा साठा संपल्याचे जाहीर केले जाते. ३०० लस येतात ते २०० नागरिकांना दिले जातात आणि प्रशासनाकडून लसीचा साठा संपल्याचे जाहीर केले जाते, याचे गौडबंगाल काय, १०० लसींचे डोस कुठे जातात, असा सवाल नागिरकांमधून होऊ लागला ओह.
काही दिवसांपासून पंढरपुरातील काही लसीकरण केंद्रांवरील लस नगरसेवकांनी पळविल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. मात्र त्यानंतरही यामध्ये सुधारणा झाल्याचे दिसत नाही. सरकार वयोवृद्ध नागरिकांना खबरदारी म्हणून लसीकरण मोहीम अवलंबत आहे. मात्र काही मंडळी आपल्या जवळच्या व्यक्तींनाच लस देण्यात व्यस्त असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
----
नेमक्या लसी जातात कुठे?
पंढरपुरातील नागरिक अभय उत्पात यांच्या आई अधिकृत नोंदणी करून लस घेण्यासाठी दररोज लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. मात्र त्यांचा नंबर येण्याअगोदरच लस संपल्याचे जाहीर केले जाते. यावर त्यांनी रजिस्ट्रेशन न केलेल्या लोकांना लस दिली जात असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला आहे. दुसऱ्या एका नागरिकाने ६५ दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला. त्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी ते नागरिक लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १४० वा. नंबर होता असे सांगितले. त्या केंद्रावर २५० लस उपलब्ध होत्या. रात्री २ वाजल्यापासून ते तब्बल ६ ते ८ तास रांगेत होते. मात्र त्यांना लस मिळाली नाही. अवघ्या अर्ध्या तासात २५० लसींचा साठा गेला कुठे, अशी अनेक उदाहरणे दररोज समोर येत आहेत.
-----
लस तुटवडा संदर्भातील तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. ते थांबविण्यासाठी फ्रंटलाइन वर्कर्ससाठी वेगळे केंद्र, पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी स्वतंत्र केंद्र व ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस देण्यासाठी वेगळे केंद्र आणि सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १८ वर्षांवरील नागरिकांसाठी वेगळी सोय केल्यास गर्दी, गोंधळ होणार नाही. यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येतील.
- सचिन ढोले, प्रांताधिकारी, पंढरपूर