प्रभू पुजारीपंढरपूर : ‘तुझे दर्शन झाले आता।जातो माघारी पंढरीनाथा।।’ अशी सावळ्या विठ्ठलास आळवणी करून आषाढी वारी सोहळ्यानिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो वारकºयांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले़ त्यानंतर मंगळवारी जड अंत:करणाने सारा भार परब्रह्म विठ्ठल-रुक्मिणी यांच्यावर सोडून पंढरीचा निरोप घेतला. परिणामी दुसºयाच दिवशी निम्मी पंढरी रिकामी झाल्याचे दिसून आले़‘आता कोठे धावे मन,तुझे चरण देखिलिया !भाग गेला, शीण गेला,अवघा झाला आनंद !!’आषाढी एकादशी दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. पण पांडुरंगाची पंढरी सोडून जाण्याच्या हुरहुरीने भाविकांचे मन दाटून आले.
आषाढी एकादशीनिमित्ताने प्रमुख पालखी सोहळा, हजारो दिंड्यांसह रेल्वे, एस़ टी़ बस व खासगी वाहनांनी राज्याच्या कानाकोपºयांतून आलेल्या लाखो वारकºयांमुळे सारी पंढरीनगरी भक्तिमय बनली होती. गेल्या अनेक दिवसांपासून घुमणारे टाळ-मृदंग-वीणा यांचे स्वर यामुळे शहरातील सारे वातावरणच विठ्ठलमय झालेले होते. ६५ एकर परिसरांसह विविध मठ, मंदिर, धर्मशाळा आणि शहर व शहराबाहेर रिकाम्या जागेवर उभारलेल्या राहुट्यातून प्रवचन, कीर्तन, भजन, भारुड आदी कार्यक्रम रंगले, परिणामी सर्वत्र वारकरीमय वातावरण झाले होते.
सोमवारी रात्रभर राहुट्यांमध्ये भजन, कीर्तन केल्यावर मंगळवारी पहाटे चंद्रभागेचे स्नान करून काहींनी पांडुरंगाचे पदस्पर्श, मुखदर्शन, नामदेव पायरी दर्शन घेतले तर काहींनी कळसाचे दर्शन घेऊन सकाळपासूनच पंढरीचा निरोप घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे सकाळपासून शहरातून बाहेर जाण्यासाठी शिवाजी चौक ते स्टेशन रोड, सोलापूर मार्गावरील पुलावर, तीन रस्ता, गोपाळपूर रस्ता, करकंब रस्ता, रेल्वे स्टेशन, चंद्रभागा बसस्थानक आदी ठिकाणी वारकºयांची दाटी झाली होती़
आषाढीनिमित्त पंढरीत १५ लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते, मात्र दुसºयाच दिवशी त्यातील ५० टक्क्यांहून अधिक भाविक दर्शन घेऊन गावाकडे परतले. त्यामुळे पंढरपुरात आज निम्मी गर्दी कमी झाली. शहरातील गर्दी कमी झाली असली तरी अजूनही दर्शन रांगेत लाखावर भाविक असल्याचे चित्र दिसत होते.
आनंदाने मन अन् खरेदीने बॅग भरली !- वारकºयांनी परत जाताना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्ताशे, पेढा, हळद-कुंकू, बुक्का व विभुती, विठ्ठल-रक्मिणीमातेचे फोटो, टाळ-मृदंग-पेटी, पखवाज यासारखी संगीत वाद्ये, देवघरातील पितळी मूर्ती, दगडी मूर्ती, कुंकू, उदबत्त्या आणि घरातील चिमुकल्यांसाठी खेळणी अशी भरपूर खरेदी मोकळ्या हातांनी केली. महिला भाविकांनी समई, पणत्या, पंचपाळा यासह काटवट, बेलणे-पोळपाट, रवी आदी संसारिक साहित्यांची खरेदी केली़ त्यामुळे जाताना वारकºयांचे मन जसे आनंदाने भरले तसेच त्यांच्या बॅगाही खरेदीने भरल्या होत्या़
रात्रभर गरजली पंढरी...- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या भाविकांनी मठांमध्ये, राहुट्यांमध्ये भजन-कीर्तन भारूडाचा आनंद घेतला. त्यामुळे पंढरपूर शहरात रात्रीही दूरदूरपर्यंत टाळांचा किनकिनाट, पखवाजाची थाप, हरिनामाचा गजर, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाचा ध्वनी ऐकू येत होता. अनेक हौशी तरुण वारकºयांनी रात्री विविध ठिकाणची गर्दी कमी झाल्यावर वाजत गाजत भजन म्हणत विविध खेळ खेळले आणि वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचा आनंद लुटला.