वळसंग येथे सोमवारी टोलनाक्यावर व्यावसायिक वाहनांना टोल वसुली सुरू करण्यात आली. या विरोधात प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेने आज सकाळी टोलनाक्यावर आंदोलन केले. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेही आंदोलनात सहभागी झाले. स्थानिक रहिवाशांना शेतीकामासह विविध कारणाने गावाच्या जवळ ये-जा करावी लागते. त्यामुळे त्यांना टोलमधून सवलत देण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली होती. सकाळी बारा वाजता सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन अडीच वाजता संपले. यादरम्यान सर्व वाहनांना मोकळीक देण्यात आली होती.
यावेळी तहसीलदार अमोल कुंभार, वळसंग पोलीस ठाण्याचे सपोनि अतुल भोसले, प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के, संपर्कप्रमुख जमीरभाई शेख, शहर प्रमुख अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिद मनियार, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मोहसिन तांबोळी, वळसंगचे सरपंच श्रीशैल दुधगी, माजी सरपंच महादेव होटकर, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
-------
१ ऑक्टोबरला बैठक
स्थानिकांना टोलमधून सूट देता येते का अथवा स्थानिकांना नोकऱ्या देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे परिचलन अधिकारी अनिल विपत यांनी आंदोलकांना दिली.
-------
तूर्त आठ दिवस टोलमाफी
स्थानिकांना टोलमाफीतून सवलत मिळावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेने वळसंग येथील नव्या टोल प्लाझावर केलेल्या आंदोलनाला तात्पुरते यश मिळाले. आठ दिवस स्थानिकांची टोल वसुली थांबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अंतिम निर्णयासाठी मात्र वरिष्ठ पातळीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
.......
फोटो आहेत