सोलापूर : कुसुर - तेलगाव (भीमा) गावादरम्यान झालेल्या दुचाकींच्या भीषण अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा तरुण पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्या नातलगांची मोठी पंचाईत झाली. बाह्य शवविच्छेदन करून प्रेताची विल्हेवाट लावावी लागली.
मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नागनाथ कन्हैयालाल भोई (४०, रा. बेगमपूर) आणि गजानन भीमण्णा हल्संगी (२४, रा. निवर्गी, ता. इंडी) यांच्या दुचाकींची समोरासमोर जोराची धडक बसली. धडक इतकी भीषण होती की त्यापैकी एका दुचाकीचा चक्काचूर झाला. दुचाकीस्वार गजानन हल्संगी गंभीर जखमी झाला, तर त्याच्या पाठीमागे बसलेला श्रीकांत सिद्धप्पा हल्संगी जखमी झाला. दुसऱ्या दुचाकीवरील नागनाथ भोई आणि त्यांच्या पत्नी शारदा भोई हे दोघेही जखमी झाले. ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या गजानन हल्संगी याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान गजानन हल्संगी याचा मृत्यू झाला. रॅपिड ॲन्टिजन चाचणीत तो पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे त्याचे शवविच्छेदन करणे जिकिरीचे झाले. नातेवाइकांची मोठी पंचाईत झाली. अखेर बाह्य शवविच्छेदन करावे लागले. अंतिम संस्कारासाठी प्रेत ताब्यात मिळण्यासाठी नातलगांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून निवर्गी (ता. इंडी) येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पो. कॉ. नाईकवाडी घटनेचा तपास करीत आहेत.
-------