दहा वर्षापासून गायब झालेल्या सत्यवानचा नातलगांनी शोध घेऊनही त्यांना तो सापडला नाही. अचानक पाकिस्ताच्या सीमेवर तीन महिन्यापूर्वी तो आढळून आला. पाकिस्तानच्या जवानांनी त्यांना पकडून कारागृहात ठेवले होते. तो भारतीय असल्याचा तपासात समोर येताच त्यानी अमृतसर येथील भारतीय जवानांच्या ताब्यात दिले. यानंतर भारतीय जवानांच्या तपासात ते लऊळ येथील असल्याचे समोर आले. त्यांनी कुर्डूवाडी पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार कुर्डूवाडी पोलिसांचे एक पथक शनिवारी पहाटे रेल्वेने त्याच्या पुतण्याला सोबत घेऊन अमृतसर येथे त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. तिथे सर्व सोपस्कार पूर्ण करून सत्यवान याला ताब्यात घेतले. सहा दिवसाच्या प्रवासानंतर गुरुवारी दुपारी ३.३० च्या दरम्यान कुर्डूवाडीत दाखल झाले. त्याची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून पुतण्या गणेश भोंग याच्या ताब्यात देण्यात आले. सत्यवान भोंग घरी पोहचताच संपूर्ण कुटुंबाने एकच जल्लोष केला. सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
सोपस्कार पार पाडण्यात तीन महिने उलटले
पाकिस्तान जवानांनी सत्यवान भोंग याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे पाहून त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्याला सीमेवरील भारतीय जवानांकडे सोपविले. यानंतर भारतीय जवानांनी त्याची कसून चौकशी केली असता सत्यवान भोंग याने त्यांना आपल्या गावाची संपूर्ण माहिती दिली होती. याचा आधार घेत भारतीय जवानांनी प्रथम मुंबई पोलिसांना संपर्क केला होता. तेथून कुर्डूवाडी पोलिसांना संपर्क केला असता त्याची ओळख पटली होती. परंतु कोरोना कालावधी असल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खूप वेळ गेला. अखेर सर्व सोपस्कार झाल्यानंतर कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे फौजदार हनुमंत वाघमारे यांचे पथक अमृतसरला गेले आणि गुरुवारी दुपारी पथक कुर्डूवाडीत दाखल झाले. सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला.
फोटो ओळ -०४कुर्डूवाडी-सत्यवान
अमृतसरच्या लष्करी जवानांंकडून लउळचा मनोरुग्ण सत्यवान भोंग याला ताब्यात घेताना कुर्डूवाडी ठाण्याचे फौजदार हनुमंत वाघमारे व त्यांचे पथक.