कुसळंब : बार्शी तालुक्यातील बावी आ. येथील एका तरुणाने सावकाराच्या त्रासाला कंटाळून द्राक्षावर फवारणी करणारे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ५ मार्च रोजी सकाळी ७ च्या सुमारास बावी येथे घडली. प्रभाकर महादेव कवडे (वय ३१) असे या तरुणाचे नाव आहे.
कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०१६ मध्ये गावातील हसन शेख यांच्याकडून फिर्यादीने व्याजाने पंधरा हजार रुपये घेतले होते. त्याचे व्याजासह ६० हजार रुपये परत केले. मग गावातील दुसरा सावकार सुधीर दिलीप पाटील यांच्याकडून एप्रिल २०२० मध्ये १० हजार रुपये घेतले होते. त्याचेही व्याजासह सर्व पैसे दिले परंतु सतत तुझ्याकडे माझे पैसे आहेत. हिशोब बरोबर केला नाहीस म्हणून ४ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास यातील सुधीर पाटील व शरद झाडे हे मोटरसायकलवर फिर्यादीच्या मावशीच्या शेतात आले. त्यावेळी फिर्यादीस शिवीगाळ करून दमदाटी केली. तुला उद्या सकाळपर्यंत माझे पैसे द्यावे लागतील असा दम भरून निघून गेले. त्यानंतर संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मी व माझी मावशी नागरबाई निर्मळ यांचे शेतामध्ये काम करीत असताना हसन शेख, सुधीर पाटील, शरद झाडे हे तिघे दारू पिऊन येऊन मावशीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तिच्या पिशवीतील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मोटरसायकल (एम एच १३ वाय ०६०८) ही फिर्यादीची गाडी घेऊन गेले. जाताना ‘तू उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत जर पैसे दिले नाहीत तर उद्या तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. धमकीच्या टेन्शनमध्ये मी आमच्या मावशीच्या शेतातील द्राक्ष बागेवरील शाळेवर फवारणीचे औषध ५ मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पिलो. त्यानंतर थोड्या वेळाने चक्कर आल्याने मी बेशुद्ध पडलो. औषधोपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये आणले. शुद्धीवर आल्यानंतर ८ मार्च रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदली.
या प्रकरणी हसन शेख, सुधीर पाटील व शरद झाडे (रा. बावी आ. ) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये व सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४५ अन्वये गुन्हा नोंदला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.