शुक्रवारी सोलापुरातील सत्तर फूट रोडवरील साईबाबा चौकातील ३ तरुण तुळजापूर रोडवर गेले होते. खानपान उरकल्यानंतर महामार्गाच्या जवळच असलेल्या शेततळ्यात डुबकी मारण्याचा मोह झाला. भारत निवृत्ती खंडागळे यांच्या शेतातील शेततळ्याची संरक्षक जाळीवर चढून शेततळ्यात उतरले. त्यांना व्यवस्थित पोहता येत नसल्याने दोघे गटांगळ्या खाऊ लागले. ते पाहून त्यांच्यातील एकाने शेततळ्याच्या ताडपत्रीने एका तरुणास वाचविले. मात्र तोपर्यंत एक जण पाण्यात बुडाला. त्या दोघांनी मदतीसाठी टाहो फोडला. तो ऐकून आसपासचे शेतकरी तेथे आले. तोपर्यंत विलंब झाला होता. पोलिसांना खबर दिल्यानंतर त्यांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने दुसऱ्या दिवशी शोधमोहिमेनंतर शनिवारी मृतदेह सापडला.
या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
----
जलतरणपटूच्या मदतीने मृतदेह काढला
शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्रीचा अंधार वाढू लागल्याने ती शोध मोहीम थांबवली. पुन्हा सकाळपासून त्याचा शोध सुरू झाला. दुपारी जलतरणपटूंना यश आले. राजू उर्फ हरिदास नरसय्या रिकमल्ले (वय २५) असे मृताचे नाव आहे. शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी सोलापूर जिल्हा हौशी जलतरण संघटना, एक्विटास क्लबचे श्रीकांत शेटे, त्यांचे सहकारी जलतरणपटू, उळेगांव येथील दशरथ घाटे शेततळ्यात उतरले होते.