टेंभुर्णी : भरधाव वेगातील कारची धडक बसून दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले, तर एक युवक गंभीर जखमी होऊन मरण पावला.
गणेश खंडू मुळे (वय २४, रा. शिराळ (टें), ता. माढा) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव असून, या अपघातात सोमनाथ प्रमोद माने (रा. शिराळा) आणि बालाजी अभिमान चोपडे (रा.व्हळे) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान टेंभुर्णी शहरातून गेलेल्या जुन्या महामार्गावर एका हॉटेलसमोर हा अपघात झाला. या अपघातानंतर कार चालक तेथून फरार झाला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार सोमवारी सायंकाळी जुन्या महामार्गावरून एका कार (एम.एच. १३/ ए.झेड.०००७) भरधाव वेगात निघालेली होती. एका हॉटेलसमोरील रस्त्यावरून मोपेड (एमएच १२/ जेएक्स ७४८०) ला आणि दुचाकी (एमएच ४५/क्यूझेड २९५६) ला या कारने जोरात धडक दिली. या अपघातात दोन्ही लहान वाहने ही रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्या. मोपेडवरील गणेश मुळे व सोमनाथ माने यांच्या डोक्याला मार लागल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. दरम्यान, गणेश मुळे याचा रात्री मृत्यू झाला, तर सोमनाथ माने याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याशिवाय दुचाकीस्वार बालाजी अभिमान चोपडे हेही या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर टेंभुर्णी येथे उपचार चालू आहेत.
----
कारचालक फरार
कारचालक हा माळेगाव (ता. माढा) येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. तो सोमवारी घरात लग्नकार्य असल्याने माहीजळगाव येथे व-हाडी मंडळी घेऊन गेला होता. तेथेही त्याने मद्यप्राशन करून लग्नात गोंधळ घातल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. टेंभुर्णी पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. मात्र तो येथून पळून गेल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
----
फोटाे : ०८ गणेश मुळे