माढा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना आता हळूहळू हद्दपार होऊ लागला आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येईल आणि त्यात लहान मुलांना अधिकचा धोका असेल असे काही वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या निष्कर्षावरून येथील सर्व आपत्ती कालीन यंत्रणा त्याबाबत काम करू लागली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील ० ते १८ वयाच्या गटातील एकूण ९३ हजार ४६९ लहान मुलांच्या व युवकांच्या मातांना लसीकरणात पहिल्यांदा संधी देण्याचे नियोजन आखले जात आहे.
लहान बालकांना संसर्ग झाला तर या काळात त्यांच्या सोबत सांभाळ करण्यासाठी असणारी त्याची माता सुरक्षित असली पाहिजे या उद्देशाने हा निर्णय योग्य वाटत असल्याने त्या मातांच्या लसीकरणाला परवानगी द्यावी, असा प्रस्ताव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्याकडे ठेवला आहे.
----
संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी
याबाबत येथील उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी तालुक्यातील सर्व बालरोगतज्ज्ञांची मागील आठवड्यात एक बैठक घेतली. त्यात ज्या डॉक्टरांना भविष्यात लहान मुलांचे डेडिकेटेड हॉस्पिटल सेंटर सुरू करायचे आहेत त्यांनी तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देत सर्व रुग्णालयात वीस टक्के बेड शिल्लक ठेवण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. याबरोबरच माढा व कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन प्लँटही तयार करण्यात येत आहेत. यामुळे येणाऱ्या तिसऱ्या लाटेबाबत येथील यंत्रणा आतापासूनच काम करू लागली आहे.
----