सोलापूर जिल्ह्यातील माझ्या बंधू-भगिनींनो. गेले तीन महिने आपण कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जात आहोत. अचानकपणे आलेल्या या महामारीने आपल्याला बरेच काही शिकवलेले आहे. कोरोनाचे हे अरिष्ट फक्त आपल्यावरच नाही तर जगातील अनेक देशांतील नागरिक याला तोंड देत आहेत. अजूनही हे संकट कधी संपणार हे आपल्याला माहीत नाही. आपण सर्व जण कोरोना विषाणूबरोबर जिद्दीने लढा देत आहोत. आपली ही जिद्द कायम ठेवू यात व आता आपल्याला कोरोनाबरोबर जगायला शिकले पाहिजे, असे मला वाटत आहे.
माझं कुटुंब पुण्यात आहे. २७ फेब्रुवारीला मी कुटुंबाला भेटलो आहे. त्यानंतर कोरोना महामारीचे संकट आले व या साथीचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी स्थापन केलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीचा भाग बनून गेलो आहे. पुणे, मुंबईत या साथीचे रुग्ण आढळल्यावर सुरुवातीला आपला जिल्हा सुरक्षित होता. १२ एप्रिलनंतर सोलापुरात कोरोनाचे रुग्ण आढळत गेले. सोलापूर शहरात लोकवस्ती दाट असल्याने ही साथ पसरत गेली. जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले. कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रत्येक प्रयत्नाला अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी साथ दिली म्हणूनच या संकटाला आजही आपण धैर्याने तोंड देत आहोत. यासाठी आरोग्य विभागातील प्रत्येक घटक रात्रंदिवस राबताना दिसत आहे. त्यांना पोलीस व इतर कर्मचाºयांची मोठी मदत होत आहे.
दुर्भाग्याने आपल्याला आता हे स्वीकारायला हवे की, आपल्याला आता पुढील काही काळ कोरोनासोबतच जगायचे आहे. या काळात आपल्याला सर्वात महत्त्वाच्या अशा तीन गोष्टी पाळाव्याच लागतील. फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर आणि साबणाने वारंवार हात धुणे. कोरोना विषाणू आपल्या शरीरात डोळे, नाक व तोंडावाटे प्रवेश करू शकतो. नैसर्गिकरित्या आपला हात डोळे, नाक आणि तोंडावर वारंवार फिरविला जातो. हा सवयीचा भाग असला तरी नकळत या क्रियेमुळे कोरोना विषाणूचा आपल्या शरीररात शिरकाव होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपला हात नेहमी स्वच्छ असला पाहिजे, या गोष्टीची सतत काळजी घेणे गरजेचे आहे. मला काम करताना बºयाच महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या. कोरोनाच्या साथीला जे बळी पडले आहेत ती आपली ज्येष्ठ मंडळी आहेत. खरंतर यांचा यात काहीच दोष नव्हता. या साथीचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये ते कधी घरातून बाहेर पडलेले नसतील. तरीही त्यांना या विषाणूची बाधा झाली. कोरोनाची बाधा झालेल्या ८० ते ८५ टक्के लोकांमध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे अशा लोकांची चाचणी झालेली नसल्याने आपल्याला ते बाधित आहेत हे माहिती नसते. त्यामुळे कोण कोणाला बाधा करेल हे सांगता येत नाही. असा प्रसार थांबविण्यासाठी चाचण्या वाढविणे गरजेचे आहे. प्रशासन ही व्यवस्था करीत आहे, पण जागरूक नागरिक म्हणून २० ते ४० दरम्यानच्या तरुण मंडळींनी किमान घरातील वयस्कर मंडळींपासून दूर रहावे. जे बाहेर कामानिमित्त फिरतात त्यांनी आपल्या आईवडील, आजोबांशी संपर्क करू नये. घरात कोणी डायबेटीस, दमा, कॅन्सर, बीपीच्या व्यक्ती असतील तर त्यांची काळजी घ्या.
सोलापूरच्या बाबतीत या गोष्टी दिसून आलेल्या आहेत की, कोरोनामुळे बळी पडलेल्यांना वरीलपैकी कोणता तरी आजार आहेच. अशांना ज्यावेळी कोरोना विषाणूची बाधा होते तेव्हा त्यांना उपचार करण्यास वेळसुद्धा मिळत नाही. उपचारास दाखल केल्यावर तासाभरात, दोन किंवा चार तासात त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही गोष्ट गांभीर्याने घ्या. विभागीय आयुक्तांनी आम्हाला याबाबत सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही आता घरोघरी जाऊन ज्येष्ठ लोकांची यादी बनवित आहोत. घरात कोणालाही सर्दी, खोकला किंवा ताप असा त्रास झाल्यास मेडिकलमधून गोळ्या खाऊन आजार अंगावर काढू नका. तातडीने जवळच्या फीव्हर ओपीडीमध्ये दाखल व्हा. यामुळे तुमच्या आजारावर वेळीच उपचार होतील.
येणारे आमचेच, पण काळजी घ्या...- बाहेर जिल्ह्यात कामानिमित्त गेलेल्या व्यक्ती मोठ्या संख्येने परत येत आहेत. येणारे सर्व जण आपलेच आहेत. त्यामुळे त्यांना अडवू नका. पण येणाºयांनी सर्वांची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने तयार केलेल्या क्वारंटाईनमध्ये त्यांनी सहभागी व्हावे. आरोग्य तपासणी करून घ्यावी. ठरलेल्या कालावधीत क्वारंटाईनमध्येच मुक्काम करावा, जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही. त्रास झाल्यास तत्काळ आरोग्य केंद्रात दाखल व्हावे. सोबत आलेली मुले व महिलांचीही काळजी घ्या.नोकरदारांनी काळजी घेणे महत्त्वाचे- नोकरदारांनाही आता कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी या लढ्यात उतरलेले आहेतच. पण त्यांनीही आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यायची आहे. घरी आल्यावर कपड्यांचे सॅनिटायझर व स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यालयात फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर करावा.