सोलापूर : महापालिका पुढील आठवड्यापासून मिळकत कराच्या बिलांचे वाटप करणार आहे. बिल पावत्यांवर मिळकतींचा फोटो आणि पेमेंटसाठी क्यूआर कोड असणार आहे, अशी माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महापालिकेने सायबर टेक कंपनीमार्फत शहरातील मिळकतींचे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) च्या आधारे सर्वेक्षण करून घेत आहे. गेल्या सहा वर्षांपासून हे काम सुरू आहे. मागील दीड वर्षात या कामाला पुन्हा गती मिळाली. शहरात एक लाख ९५ हजार २७६ मिळकती आहेत. यापैकी एक लाख ६८ हजार ८२९ मिळकतींचे जीओ टॅगिंग पूर्ण झाले आहे. महापालिकेकडील नोंदीनुसार यापूर्वी मिळकतींच्या बिलांचे वाटप करण्यात येत होते. अनेक मिळकतींच्या मोजमापात फेरबदल झाले आहेत, पण महापालिकेकडे त्याची नोंद नसल्यामुळे कमी दराने कर आकारणी होत होती. जीआयएसच्या सर्वेक्षणात मिळकतींची नव्याने मोजमापे घेण्यात आली. या नव्या नोंदीच्या आधारे मिळकतदारांना कर आकारण्याच्या नोटिसा देण्यात येतील. त्यावर हरकती मागविण्यात येतील. हरकती न आल्यास नव्या नोंदीनुसार कर आकारणी होईल आणि महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
दरम्यान, जीआयएसच्या कामाला विलंब झाल्यामुळे महापालिकेने सायबर टेक कंपनीचे बिल रोखले होते. हा वाद एप्रिल महिना अखेरीस निकाली निघाला. या काळात महापालिकेने रोखीने मिळकतकर वसुली बंद ठेवली होती. एक मेपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. पुढील आठवड्यात शहरातील सर्व मिळकतदारांना बिलांचे वाटप करण्यात येणार आहे. ढेंगळे-पाटील म्हणाले, नव्या बिलाच्या पावत्यांवर मिळकतींचे फोटो असतील. या कामाची चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे. शिवाय पावतीवर महापालिकेच्या पेमेंट गेटवेचा क्यूआर कोड असेल. मिळकतदाराने हा क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केल्यास थेट महापालिकेच्या वेबसाईटवर जाता येईल.
वेबसाईटवरील पेमेंट गेटवेवरून मिळकतदारांना बिल अदा करता येईल. राज्यातील काही मोजक्या महापालिकांमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध होत आहे. मिळकतकर एसएमएसवर पाठविण्याचा प्रयत्न आहे, पण अद्याप बºयाच मिळकतदारांचे मोबाईल नंबर नोंद नाहीत. मोबाईल नंबरच्या नोंदीनंतर ही सुविधा मिळेल, असा दावाही ढेंगळे-पाटील यांनी केला.
डिजिटल पेमेंट केल्यास सवलत मिळणार- बिलाचे वाटप झाल्यानंतर महापालिका वसुली मोहीम राबविणार आहे. मिळकतदारांनी एकवट पैसे भरल्यास पाच टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत ३० जूनपर्यंत असेल. शिवाय मिळकतदारांनी डिजिटल पेमेंट केल्यास आणखी एक टक्का सवलत मिळेल. नव्या पद्धतीच्या पावत्या आणि यंत्रणा बसविण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे मागील काही दिवस मिळकतकर कार्यालयातील काम बंद ठेवावे लागले होते. आता काहीच अडचण नाही, असेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.