विठ्ठल खेळगी
सोलापूर : पंधरा वर्षांनंतर जुन्या वाहनांची वयोमर्यादा संपते. अशा धोकादायक वाहनांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, शहरात १५ वर्षांवरील वाहने आजही रस्त्यावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवास घेऊन नियमित धावतात. अशा वाहनांमधून प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दुर्दैवाने अपघात झाल्यास निष्पाप लोकांचा बळी जातो. त्यामुळे भंगार वाहने रस्त्यावर हद्दपार करण्यासाठी कडक पाऊले उचलण्याची गरज आहे.
दररोज शेकडो वाहने रस्त्यावर धावत आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार पंधरा वर्षांनंतर वाहनांची वयोमर्यादा ओलांडल्यानंतर दर पाच वर्षांनी वाहनांचे नूतनीकरण करून कर भरणे आवश्यक आहे. सध्या आरोग्याचे प्रश्न देखील ऐरणीवर आहेत. वाहन अनफिट असेल तर त्वरित कार्यवाही करून स्क्रॅप करणे अत्यावश्यक आहे. वाहनांची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास अशी वाहने आरटीओने कारवाईमध्ये थेट जप्त करायला हवीत. गेल्या पंधरा दिवसांत एसटी गाड्या बंद असल्यामुळे खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात धावत होत्या. भंगार गाड्यांतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाताना दिसून आले. शिवाय टेम्पोंमधून माणसे उभारुन लटकत जातानाही पाहायला मिळाले. जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, कारण जीव महत्त्वाचा आहे.
.......
प्रवासी वाहनांची तपासणी करताना भंगार गाड्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. फिटनेस प्रमाणपत्र नसेल, तर ती गाडी ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात येते. प्रवाशांनीही मुदत संपलेल्या जुन्या गाड्यातून प्रवास करून जीव धोक्यात घालू नये.
- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
नाईलास्तव मिळेल त्या गाडीत बसावे लागले
एसटी गाड्या बंद आहेत. शिवाय एसटी गाड्या सुरु असतानाही अनेकवेळा त्या गाड्या फुल्ल असतात. खाजगी गाड्यात माणसे कोंबून भरतात. मात्र, नाईलास्तव मिळेल त्या गाडीत बसूनच प्रवास करावा लागतो.
- अमर कांबळे, प्रवासी
खाजगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतात. गाड्या जुन्या झालेल्या असतात. तरीही रस्त्यावर धावतात. एसटी भेटत नसल्यामुळे त्याच भंगार गाड्यातूनच प्रवास करावा लागतो.
- सिद्धनाथ म्हेत्री, प्रवासी
..............
दीडपट भाडे देऊनही जिवाला धोका
गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. कर्मचारी संपावर असल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. याचा फायदा आता खसगी वाहतूकदारांना होताना दिसत आहे. एसटी बस सेवा बंद असल्याने खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू असून, भाड्यामध्ये तब्बल दीडपटीने वाढ करण्यात आली आहे. दीडपट भाडे देऊन देखील बऱ्याच वेळा वाहन वेळेवर मिळत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
.............
जिल्हातील एकूण प्रवासी वाहने : १८२२९