अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवशी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान फोन आला. ‘हॅलो.. मी एस. बी. आय. च्या ... या शाखेतून बोलतेय.’ मी म्हटलं ‘हां..बोला. तुम्ही आनंदा घोडकेच ना!’ तिकडून विचारणा झाली. मला वाटलं महिलेचा आवाज आहे म्हणजे बँकेतूनच असेल फोन म्हणून ‘होय..मीच आहे!’ म्हटलं. ‘तुमच्या नावे ७५ हजार रुपये कर्ज मंजूर झाले आहे... तुमची माहिती हवी आहे.’ एटीएम व आॅनलाईन बँकिंगमुळे मागील तीन-चार महिने तरी मी बँकेत गेल्याचे आठवत नाही म्हणजे कर्जासाठी अर्ज करण्याचा प्रश्न येतोच कुठे? मग माझ्या लक्षात आले की हा फोन बँकेचा नसेलच! मग मी त्या फोन करणाºया महिलेला प्रतिप्रश्न केला, ‘तुम्ही बँकेतूनच बोलता म्हटल्यावर तिथे स्क्रीनवर माझी माहिती असेलच, माझे नाव, नंबर पत्ता...ठेवा फोन आणि परत करू नका... माझ्या कर्जाचं मी बघून घेईन..’ आणि तेवढ्याच वेगात तिकडचा फोन बंद झाला.
तिकडून फोन बंद झाला आणि माझ्या विचारचक्रांना गती मिळाली. ‘बँकेची वेळ तर पाच वाजता संपली, उद्या आणि परवा बँकेला सुट्टी आहे मग असा फोन येण्याचा काय अर्थ. शिवाय दोन-दोन महिने बँकेत चकरा मारून सतराशे साठ पुरावे जोडूनही कर्ज मंजूर होत नाहीत आणि इथे अर्ज न करता कर्ज मंजूर झाल्याचा फोन येतो. ऐकावे ते नवलच!
बँकेची वेळ संपल्यानंतर बँकेच्या कामासाठी बँक कर्मचाºयांना ग्राहकांशी बोलता येते का? बँका असे सहजासहजी अर्ज न करता कर्ज देतीलच कसे? मागील वर्षी एका प्रापंचिक कारणासाठी एका निमसरकारी बँकेत एक लाखाच्या कर्जासाठी अर्ज केला होता. सरकारी नोकरी असूनही अनेक कागदपत्रांची जमवाजमव करावी लागली. दोन महिन्यानंतर एका कागदाच्या अपूर्ततेमुळे कर्ज नामंजूर झाले आणि इथे कोणत्याही पुराव्याशिवाय कर्ज मंजूर करण्यात आले आहे ही किती आश्चर्याची घटना आहे ना!’
एवढ्यात दुसºया मित्राचा फोन आला. मी विचारांच्या तंद्रीतच होतो आणि सहजपणे बोलून गेलो,‘हं बोला! आपण कोणत्या बँकेतून बोलता?’ ‘अरे ! मी राजू बोलतोय? काय लावलास बँक बिंक!’ त्याच्या या वाक्याने मी भानावर आलो. त्याला सर्व हकीकत सांगितली. त्यालाही पंधरा दिवसांपूर्वी असाच फोन आला होता. तो बँकेतही जाऊन आला. बँकेत चौकशी केली असता बँकेतून कोणीही फोन केला नाही आणि कार्यालयीन वेळेनंतर ग्राहकाला आम्ही फोन का करू? असा प्रतिप्रश्न ऐकूनच तो परतला.
असे फोन शक्यतो कार्यालयीन वेळेनंतर अथवा सुट्टीच्या दिवशी येतात. असे फोन घेणे टाळावे अथवा कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना पुरवू नये की जेणेकरून आपली लूट होणार नाही. आणि पुढच्या कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागणारच नाही.(लेखक जि. प. शिक्षक आहेत)