सोलापूर - गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले आहे. माेहोळ येथील शासकीय कार्यालयाच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याने एका तरूणानं चक्क रस्त्यावर ठिय्या मांडून साचलेल्या पाण्यानं आंघोळ केली. एवढेच नव्हे तर त्यानं त्याच पाण्यात हलगीच्या कडकडाटात वृक्षारोपनाचा कार्यक्रमही उरकला.
मोहोळ तालुक्यातील १०४ गावाचा संपर्क असणाऱ्या मोहोळ तहसील कचेरीच्या व पोलीस स्टेशनच्या आवारात असणाऱ्या सहा ते सात कार्यालयाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते, अशा या तहसीलच्या आवारात पावसाच्या पाण्याने तळे साचले आहे. याबाबत प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने वैतागलेल्या नागेश बिराजदार या तरुणाने तहसील कचेरीच्या आवारात साठलेल्या पाण्यात वृक्षारोपण करून चक्क आंघोळ करीत आंदोलन चालू केले आहे. या लक्षवेधी आंदोलनामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची लोकांची मोठी गर्दी झाली होती.