खटकाळ वस्ती (सरकोली) येथील द्राक्षेच्या बागेत सोमनाथ भालेराव याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला प्रथम सिकंदर टाकळी कारखान्यावरील रुग्णालयात नेले तेथून डॉक्टरांनी पंढरपुरातील रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. पंढरपुरात प्राथमिक उपचार केले. नंतर डॉक्टरांनी सोलापूर किंवा अकलूज येथे पुढील उपचाराकरिता नेण्यास सांगितले. त्यामुळे रुग्णवाहिकीतून त्याला अकलुजला नेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी वाहन बाहेरच असताना तपासून मयत झाल्याचे सांगितले.
आबासाहेब विठ्ठल भालेराव (वय ३५, रा.सरकोली, ता.पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी सोमनाथकडून एका अधिकारी व दोन पोलिसांवर वाळूचोरीसाठी पैसे घेतल्याचा आरोप केला. आबासाहेब विठ्ठल भालेराव यांनी मयत सोमनाथ विठ्ठल भालेराव यांचा मृतदेह पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणला.
----
पोलिसांवर आरोप
माझ्या भावाला वाळू काढण्यास प्रवृत्त करणारे देखील पोलीसच आहेत. तो वाळू काढत नसतानाही त्याला वाळू काढ आम्ही आहे, फक्त आमचे पैसे दे असे म्हणून वाळू काढण्यास सांगत होते. पोलीस हप्ते घेत असत. तसेच ढाब्यावर जेवणासाठी माझ्या भावाला त्रास देत होते. माझ्या भावाने पोलिसांमुळेच आत्महत्या केली आहे. यामुळे संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अन्यथा सोमनाथचा मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवणार नाही, असे म्हणून आबासाहेब भालेराव व इतर तरुणांनी बराच वेळ मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवला. पोलिसांची चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर मृतदेह हलवण्यात आला. यानंतर सोमनाथ भालेराव यांची आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे.
दोषी आढळल्यास कारवाई करु
वाळूच्या गुन्ह्याशी संबंधीत सोमनाथ भालेराव ऊर्फ भालके यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे सोमनाथने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात येईल असे असे नातेवाइकांना सांगितल्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले.
----
फोटो : सोमनाथ भालेराव
फोटो : सोमनाथ भालेराव यांच्या नातेवाइकांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याबाहेर केलेली गर्दी.