भाजपवाल्यांनी पळविल्या होत्या म्हशी; आता काँग्रेस ठोकणार षटकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:02 PM2019-09-03T13:02:30+5:302019-09-03T13:08:23+5:30
सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमची दुरावस्था; भाजपच्या आंदोलनाला काँग्रेस देणार प्रतिउत्तर
सोलापूर : काँग्रेसच्या कार्यक्रमामुळे इंदिरा गांधी पार्क स्टेडियम खराब झाले म्हणून म्हशी सोडणाºया नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या आंदोलनाला प्रतिउत्तर देण्यासाठी आता भाजपच्या कार्यक्रमामुळे मैदान खराब झाले म्हणून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते बुधवारी बॅट घेऊन मैदानावर उतरणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा रविवारी सोलापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार्क स्टेडियमवर समारोप झाला. कार्यक्रमावेळेस पाऊस झाल्याने स्टेडियमवर चिखल झाला. त्यानंतर सभेचे साहित्य वाहनांद्वारे नेण्यात आल्याने खेळपट्टीची पुरती वाट लागली आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना पार्क मैदानावर राष्ट्रीय हॅन्डबॉल स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धेसाठी काँग्रेसने खेळाडू बादशहा यांना आमंत्रित केले होते.
या कार्यक्रमासाठी मैदानावरील खेळपट्टीवर पेव्हर ब्लॉक घालण्यात आले होते. खेळपट्टीवर पेव्हर ब्लॉक घालण्यासाठी सिमेंट क्राँकीटचा वापर झाल्यामुळे पार्क स्टेडियमवरील धावपट्टी खराब झाली म्हणून भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ यांनी कार्यक्रमानंतर मैदानावर म्हशी आणून सोडल्या होत्या. आता त्यांच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे यांनी ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता इंदिरा गांधी स्टेडियमवर क्रिकेट सामना आयोजित केला आहे.
महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठासाठी मैदानावर खड्डे मारण्यात आले. पाऊस असताना लोकांची वर्दळ झाल्यामुळे चिखलामुळे मैदानाची खेळपट्टी खराब झाली. अशात सभेचे साहित्य नेण्यासाठी अवजड वाहनांचा वापर केल्यामुळे मैदानाची दुरावस्था झाली आहे. आता या मैदानावर दररोज सराव करणाºया क्रिकेटप्रेमी व खेळाडूंची अडचण झाली आहे. यापूर्वी काँग्रेसच्या कार्यक्रमामुळे मैदान खराब झाले म्हणून ओरड करणाºया नगरसेवक नागेश वल्याळ यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला आहे. आता महापालिकेत भाजपची सत्ता आहे. वल्याळ व त्यांच्या पदाधिकाºयांना मैदान व खेळपट्टीची झालेली दुरावस्था दिसत नाही काय असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
वल्याळ काय म्हणाले पहा...
काँग्रेसच्या कार्यक्रमामुळे खराब झालेली धावपट्टी अजून दुरूस्त झालेली नाही. मी आंदोलन केल्यावर तत्कालीन महापौर सुशीला आबुटे यांनी अडीच लाख खर्चुन पेव्हर ब्लॉक काढून धावपट्टी दुरूस्त केली. आम्ही स्मार्ट सिटीतून मैदानाचा विकास करीत आहोत. आजच मी आयुक्त दीपक तावरे यांना बोललो आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.
- नागेश वल्याळ, नगरसेवक