संभाजी मोटे
वाळूज : वडील मूळचे शेतकरीच... पण ते पारंपरिक शेती करायचे़ त्यांना सहकार्य करण्यासाठी बारावीलाच शिक्षण सोडले़...शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करण्याचे ठरविले अन् प्रथम सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग केली़ त्या पेरूने चक्क लखपतीच बनविले, असे तरुण शेतकरी सागर भानुदास घाडगे हे सांगत होते.
वाळूज (ता़ मोहोळ) येथील युवा शेतकरी सागर भानुदास घाडगे यांनी केवळ ५० गुंठे क्षेत्रातील पेरूच्या बागेतून तब्बल दीड लाख रुपयांचे उत्पन्न घेतले़ सागरने पारंपरिक शेती सोडून काहीतरी शेतीत नवीन प्रयोग करावा म्हणून पेरूची बाग केली. यासाठी सर्वप्रथम ५० गुंठे क्षेत्रावर शेतीची मशागत केली़ त्यानंतर त्यात शेणखत आणि कोंबडी खत टाकले़ त्यात १५ बाय १५ अंतरावर पेरूची २८० झाडे लावली़ झाडे तयार केली़ शेतकरी घाडगे यांनी पेरूची लागवड करून पाणीपुरवठा ठिबक सिंचनने केला. त्यानंतर कोणत्याही प्रकारची रासायनिक खते टाकली नाहीत़ केवळ शेणखताचाच वापर केला़ शिवाय कुठलेही कीटकनाशकही फवारले नाही़ त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने पेरूचे उत्पादन घेतले़ परिणामी त्याचा आकारही मोठा आणि चवही वेगळी जाणवली़ याच गुणवैशिष्ट्यमुळेच या पेरूकडे ग्राहक आकर्षित होऊ लागला़ हा पेरू केवळ स्थानिक बाजारपेठेत विकला गेला़. यासाठी ५० गुंठे क्षेत्रात एकूण केवळ १० हजार रुपये खर्च केला़ आॅक्टोबर महिन्यापासून पेरू तोडणीला सुरुवात केली.
आजअखेर सरासरी ४ टन माल विकला आहे़ त्यास सरासरी ४० रुपये किलोप्रमाणे दरही मिळाला़ हा पेरू स्थानिक आठवडा बाजारात विकला़ याशिवाय काही व्यापारी बागेत येऊन पेरू घेऊन गेले़ त्यातून दीड लाख रुपयांचा नफा झाल्याचे सागर यांनी सांगितले़ आमची एकूण २० एकर शेती आहे़ उर्वरित क्षेत्रात ऊस, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके घेतली जातात.
शेतकºयांनी पारंपरिक ज्वारी, हरभरा या पिकांबरोबरच शेतीत नवनवीन प्रयोग करावेत़ त्यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न मिळतेच़ विशेष म्हणजे विषमुक्त शेती करण्यावर जास्त भर द्यावा. त्यामुळे मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही़- सागर घाडगे, युवा शेतकरी, वाळूज