अशोक कांबळेमोहोळ : पोखरापूर येथील उजाड माळरानावर असणाºया खडकाळ जमिनीवर सन २०१५ मध्ये शासनाच्या जलयुक्तशिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून काढण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तलाव व ओढ्यातील पाच हजार ब्रास गाळ त्या जमिनीवर टाकला. खडकाळ जमिनीला आकार देत त्या जमिनीत वेगवेगळ्या फळांच्या अनेक झाडांची लागवड करीत तीन एकर क्षेत्रात ओडीसी जातीच्या शेवग्याच्या झाडांची लागवड करून वर्षाला तीन एकरात १५ ते २० लाख रुपये उत्पन्न घेण्याची किमया युवा शेतकरी पुष्कराज लहुराज पाटील यांनी करून दाखविली आहे.
पोखरापूर येथील पुष्कराज पाटील यांची २० एकर जमीन आहे. जमिनीचा काही भाग वगळता सर्वच क्षेत्र निव्वळ खडकाळ आहे. त्यामुळे ती जमीन पडीकच असायची. सन २०१५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून ओढे, नाले, पाझर तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली होती. ती मोहीम मोहोळ तालुक्यात तत्कालीन तहसीलदार बी. आर. माळी यांनी राबविली होती. त्यावेळी पुष्कराज पाटील यांनी या योजनेचा लाभ उचलत मंडल अधिकारी बापूसाहेब सुरवसे यांच्या सहकार्याने ढोकबाभूळगाव येथील पाझर तलाव, पोखरापूर येथील पाझर तलाव व मोहोळ येथील गणपती ओढा अशा तीन ठिकाणांहून पाच हजार ब्रास गाळ लोकसहभागातून उचलून त्या २० एकर क्षेत्रात टाकला होता.
जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने जमिनीची लेवल करून त्या जमिनीत रस्त्याच्या दुतर्फा बाजूस १५० नारळाची झाडे लावली असून, आंब्याच्या वेगवेगळ्या २५ जातीच्या झाडाची लागवड केली आहे. त्याचबरोबर फणस, पापनस, काजू , अंजीर, निंबोणी, सीताफळ, मोसंबी, संत्री, पेरू, जांभूळ, चिक्कू, डाळिंब या फळांच्या झाडाची लागवड केली आहे. आज या सर्वच झाडांना फळे लागू लागली आहेत.
फळांच्या झाडाबरोबरच! खडकाळ जमीन त्यात पाण्याची कमतरता लक्षात घेता गाळ टाकलेल्या या क्षेत्रात बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या पुष्कराज पाटील यांनी पाच महिन्यांपूर्वी ओडीसी जातीच्या शेवग्याच्या झाडाची तीन एकरावर लागवड केली आहे. कमी उंचीच्या या झाडाला मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगा लागतात. ड्रीपच्या माध्यमातून पाणी व सेंद्रिय खताच्या माध्यमातून जोपासलेल्या या शेवग्याच्या बागेला आता बहार आला असून शेंगा लागल्या आहेत.
२0 लाख उत्पन्न अपेक्षितआजमितीला एक टन शेंगा बाजारामध्ये विक्री केल्या आहेत. एकरी १५ टन अशा तीन एकरात ४० ते ४५ टन शेंगा निघतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. बाजारामध्ये ४० रुपये ते ५० रुपये भाव आहे. ४० रुपयांप्रमाणे जरी भाव मिळाला तरी या तीन एकराचे वर्षाला १५ ते २० लाख रुपये उत्पन्न घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीचे झाले सोने!- ज्या उजाड माळरानावर एकेकाळी काहीही पिकत नव्हते. त्या ठिकाणी प्रशासनाने राबविलेल्या लोकसहभागातून काढण्यात आलेल्या ओढ्या नाल्याचा गाळ नेऊन आज त्या शेतीचे सोने झाले आहे. जिद्द व चिकाटी ठेवून कोणताही उद्योग केल्यास यश निश्चित मिळते. ग्रामीण भागातील युवकांनी पारंपरिक शेती सोडून नोकरीच्या मागे न लागता शेती उद्योगाला आधुनिकतेची जोड देऊन शेती करावी, असा सल्ला पाटील यांनी दिला.