सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावरील केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सोलापूर विद्यापीठाच्या पंधराव्या युवा महोत्सवाला दिमाखात प्रारंभ झाला.
या महोत्सवाच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ़ मृणालिनी फडणवीस होत्या. प्रारंभी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले़ यावेळी सिंहगड संस्थेचे सचिव संजय नवले, विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा डॉ. व्ही. बी. पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. व्ही.बी. घुटे, अधिसभा सदस्य राजाभाऊ सरवदे, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महेश माने, अश्विनी चव्हाण, मिस महाराष्ट्र विजेती खुशबू जोशी यांच्यासह युवा महोत्सव समिती सदस्यांची उपस्थिती होती. प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. सूर्यकांत शिंदे यांनी प्रास्ताविक करून युवा महोत्सव आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला. सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले व डॉ. सुझान थॉमस यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कुलगुरू प्रा. डॉ. फडणवीस म्हणाल्या, कलेने जीवन समृद्ध बनते. एक वेगळा आनंद कलेत असतो. त्यामुळेच सोलापूर विद्यापीठाच्यावतीने दरवर्षी उन्मेषसृजन रंगाचा या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले जाते. युवा विद्यार्थी कलावंतांना एक प्रकारचे व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होते. त्यांचा उन्मेष वृद्धिंगत होतो. सतत प्रवाहात राहून सातत्याने प्रयत्न करून एका वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळवणे म्हणजे उन्मेष. असा हा विद्यापीठाचा भव्य दिव्य युवा महोत्सव सिंहगड कॉलेज मध्ये होत आहे. आता सलग चार दिवस विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करणार आहेत. सर्व कलाकारांना शुभेच्छा यावेळी कुलगुरू यांनी दिल्या.
महापौर बनशेट्टी म्हणाल्या, विद्यार्थी कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवा महोत्सवासारख्या मोठा कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे. सोलापूर शहर हे कलावंतांचे शहर म्हणून ओळखले जाते. अशा या कलावंतांच्या नगरीतील कलाकारांना वाव देण्यासाठी युवा महोत्सव मोठ्या दिमाखात व शानदार पद्धतीने होतो, ही सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना आनंद देण्याबरोबरच स्वत:ही आनंद लुटावा. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. फडणवीस आणि सिंहगड संस्थेचे संजय नवले यांनी चांगल्याप्रकारे या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी यावेळी कौतुक केले.
या कार्यक्रमास विविध कॉलेजचे प्राचार्य, संस्थेचे प्रतिनिधी, विद्यापीठाच्या विविध समितीचे सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेतांबरी मालप यांनी केले तर आभार डॉ. सुवर्णा क्षीरसागर यांनी मानले.