वैराग : बार्शी तालुक्यातील २ हजार मतदार असणा-या सासुरे गावात मागील वेळी कोट्यवधीची कामे करणा-या म्हंकाळेश्वर आघाडीच्या युवकांना निवडणुकीत पुन्हा गाव कारभार करण्याचा मतदारांनी कौल दिला आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत सासुरे येथे तात्या करंडे, रामभाऊ आवारे, प्रशांत भारती, बाळासाहेब पाटील, विवेक ताकभाते, पांडुरंग करंडे, श्रीकांत भारती, सुनील पाटील, पांडुरंग करंडे यांनी पारदर्शी कारभार करून दर महिन्याला चावडीवर जमा-खर्चाचा हिशोब मांडण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे व आश्वासनाप्रमाणे या युवकांनी रुग्णवाहिकेसह सुमारे २ कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. गावात सर्वत्र सिमेंट रस्ते व भुयारी गटार व्यवस्था केली. वृक्षारोपण, मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. रामभाऊ आवारे व महमंद शेख या दोन सदस्यांनी शेतातील बागायत क्षेत्र कमी करून स्वमालकीच्या विंधन विहिरीतून गावाला कायमस्वरूपी पाणी पुरवठा केला. याचा परिणाम म्हणून सासुरे मतदारांनी पुन्हा याच युवकांना गावगाडा हाकण्याची दिली.
नवीन पाण्याची टाकी व पाइपलाइन करून गावाचा कायमचा पाणी प्रश्न सोडवला. मुस्लीम व वडार समाजाच्या आत्मीयतेचा प्रश्न सोडवला. अनेक विकास कामे केली. एकाही सदस्यावर भ्रष्टाचाराचा कलंक लागला नाही. यामुळेच गावाने पुन्हा त्यांना स्वीकारल्याची प्रतिक्रिया सरपंचपदाचे दावेदार रामभाऊ आवारे व तात्या करंडे यांनी व्यक्त केली.
पाणंद रस्ते, शेतक-यांना रस्ते उपलब्ध करून देणार, पाणलोट क्षेत्र वाढवण्यावर भर देणार, पाटोद्याच्या धर्तीवर पिठाची चक्की व शुद्ध पाणी माफक दरात चालवणार असल्याचे श्रीकांत भारती व बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
-------