गेल्या दीड वर्षापासून कोरोना परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा बंद ठेवल्या. यामुळे शाळांची दुरवस्था झाली. शाळा बंदच्या काळात माळशिरस तालुक्यातील मुंडफणेवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दिलीप स्वामी यांचा ‘स्वच्छ शाळा व सुंदर शाळा’ अभियान हा उपक्रम श्रमदानातून राबविला. लोकसहभागातून शाळेच्या सुशोभिकरणावर भर दिला.
शाळेची रंगरंगोटी, भिंतीवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली. सर्व भिंती बोलक्या केल्या. शाळा डिजिटल करण्यासाठी दोन्ही शिक्षकांनी टीव्ही, संगणक, टॅबही खरेदी केले. त्यातूनच शाळा टॅबयुक्त शाळेकडे वाटचाल करत आहे. शौचालय, पिण्याच्या पाण्याची टाकी, परसबाग, पार्किंग, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी लागणारे साहित्य याचीही सोय केली. त्यामुळे शाळेची इमारती अधिकच सुंदर दिसत आहे. आता फक्त विद्यार्थ्यांची प्रतीक्षा असल्याचे मुख्याध्यापक समीर लोणकर व सहशिक्षिका अर्चना वाघ यांनी सांगितले.
लोकसहभागाचा हातभार
शिक्षकांची धडपड पाहून ग्रामस्थही शाळेच्या कामात मदतीला धावून आले. एक पद, एक वृक्ष अंतर्गत जयकुमार मुंडफणे व अभिषेक मुंडफणे यांच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त शालेय परिसरात १५ हजारांची रोपे लावली. त्यात डॉ. सुधीर पोफळे, सोमनाथ सुरवसे, सुनील चव्हाण, सुरेश कोरे, महावीर वाघ, नितीन साने यांच्यासह पालकांच्या प्रयत्नामुळे शाळेचे रुपडे पालटून गेले आणि शाळा केवळ सुंदरच नव्हे, तर डिजिटलही झाली.
कोट ::::::::::::::
‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविले. या संकल्पनेतून मुंडफणेवाडी जि. प. प्रा. शाळा पालक, लोकसहभाग व शिक्षकांच्या सहकार्यातून एकूण शैक्षणिक उठाव ९० हजार झाला. त्यापैकी आम्ही दोघांनी ६० हजार स्वतःचे घालून शाळेचे रूप पालटले.
- समीर लोणकर, मुख्याध्यापक