भीमानगर : माढा तालुक्यातील आढेगाव पाटी ते टाकळी टे येथे रस्त्याचे काम करताना खडी खाली डांबर न टाकताच निकृष्ट पद्धतीने काम सुरू असल्याने जिल्हा परिषद सदस्या अंजनादेवी शिवाजीराव पाटील यांनी या निकृष्ट कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून काम बंद केले.
आढेगाव पाटी ते टाकळी टे या प्रजिमा १३८ या ०.५ कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ट कामे करण्यात येत असल्याची तक्रार परिसरातील टाकळी टे., वडोली, आढेगाव येथील सरपंच व शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्या अंजनादेवी पाटील यांच्याकडे केली होती. यावेळी पाटील यांनी प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. येथे डांबर न टाकताच खडी पसरून काम करण्यात येत होते. शासनाने केलेल्या निर्देशाप्रमाणे काम होत नसल्याने पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तक्रार करूनही कामाच्या दर्जात सुधारणा झाली नाही, तर प्रसंगी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे शिवाजीराव पाटील यांनी म्हटले आहे.
----