सोलापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती गण, गटाच्या निवडणुकीचे आरक्षणाचे प्रारूप दि. २९ जुलैला जाहीर होणार आहे. दि. २९ ते २ ऑगस्ट दरम्यान यावर जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे आरक्षण दि.२८ जुलैला दुपारी तीन वाजता नियोजन भवनातील सभागृहात काढण्यात येणार आहे. याच दिवशी पंचायत समितीच्या निवडणुकीचे आरक्षण संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती सभागृहात सकाळी अकरा वाजता काढण्यास सुरुवात होणार आहे. आज मंगळवारी( दि. २६ जुलै) या आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. सूचना प्रसिद्धीनंतर दि.२८ जुलैला जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत, तर पंचायत समित्यांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
आरक्षण सोडत काढल्यानंतर, दि. २९ जुलैला नवीन आरक्षणाची प्रारूप अधिसूचना जाहीर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित ठेवण्यास सर्वोच्च न्यायालयाने आता परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा हा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. दि.२९ जुलैला जाहीर होणार आहे. दि.२९ ते २ ऑगस्ट दरम्यान यावर जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. दि. ५ ऑगस्टला नवे आरक्षण अंतिम होणार आहे.
एकाच वेळी जिल्ह्यात निघणार आरक्षण : विठ्ठल उदमले
० जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गण, गट निवडणुकीसाठी दि.२८ जुलैला एकाच दिवशी आरक्षण काढले जाणार आहे. त्यासाठी नियोजन भवन व संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात सभेचे आयोजन केले आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी केले आहे.