सोलापूर: लोकसभेनंतर पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या निमित्ताने स्थगित केलेली जिल्हा परिषदांच्या कर्मचारी भरतीची कार्यवाही थांबविण्याचे आदेश ग्रामविकास खात्याने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जि.प.च्या जागा वर्षभरासाठी तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भरण्याचे अधिकार जिल्हा परिषद प्रशासनाला आहेत. त्यासाठी राज्य शासनाने १७ डिसेंबर २००९ मध्ये वेळापत्रक निश्चित करुन दिले होते. त्यानुसार पुढील वर्षीच्या एप्रिलपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची यावर्षीच्या मे महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाते. या आदेशानुसार रिक्त होणारी सर्व पदे सुरुवातीची काही वर्षे भरण्यात आली. परंतु यामुळे शासनाच्या तिजोरीवर ताण पडू लागल्याने रिक्त पदांच्या तीन टक्के पदे भरण्याचे आदेश शासनाने काढले. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदांची संख्या वरचेवर वाढत आहे. रिक्त पदांची संख्या वाढू लागल्याने कामकाजावर कमालीचा परिणाम होऊ लागल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासनाकडून शासनाकडे गेल्या होत्या. ५ जून २०१४ च्या शासन आदेशान्वये तीन टक्के पद भरतीची कमाल मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. याशिवाय तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद कर्मचारी भरती मेऐवजी जुलै महिन्यात करण्याचे वेळापत्रक शासनाने २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदांना दिले होते. त्यानंतर राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. या कालावधीत कर्मचारी भरतीची जाहिरात द्यावी किंवा कसे, अशी विचारणा जिल्हा परिषदांकडून झाली होती. त्यावर शासनाने भरती प्रक्रिया थांबविण्याचे आदेश सोमवारी (दि.१६ जून) काढण्यात आले आहेत. या दरम्यान राज्यातील आदिवासी क्षेत्राकरिता पद भरतीचे निकष राज्यपालांकडून ९ जून २०१४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे विहित करण्यात आले आहेत. यामुळे पद भरतीचे निकष किमान आदिवासी क्षेत्रात बदलण्याची शक्यता आहे.---------------------------------आता भरती शक्य आहे का?अगोदर रिक्त होणाऱ्या पदांच्या तीन टक्के पदे दरवर्षी भरण्याचे आदेश शासनाने काढले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुका लक्षात घेता रिक्त होणाऱ्या पदांच्या तीन टक्के पदे भरण्याची अट शिथिल केली असली तरी आता पदे भरण्याचा निर्णय थांबविला आहे. जाहिरात देणे, अर्ज मागविणे, परीक्षा घेणे व पात्र उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेला किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी हे शक्य होणार का?, असा प्रश्न आहे. ------------------------------शासनाच्या आदेशानुसार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पदे भरण्यात येणार नाहीत. जि.प.कडील कर्मचाऱ्यांमधून पदोन्नतीने भरण्यात येणारी पदे आमच्या पातळीवर भरण्यात येतील.-प्रभू जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी(प्र)
जिल्हा परिषद कर्मचारी भरती थांबवली
By admin | Published: June 18, 2014 12:50 AM