शीतलकुमार कांबळे
सोलापूर : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. त्यामुळे अनेक कामे मागे राहिली. ही कामे पूर्ण करण्यासाठी आता शनीवार व रविवारीही जिल्हा परिषद सुरु असणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेला मिळालेला 2021-22 चा अखर्चित निधी मार्च 2023 अखेरपर्यंत खर्च करण्यावर जिल्हा परिषद प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे. अधिकाधिक कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. बांधकाम विभाग, जनसुविधा, नागरीसुविधा, शाळा व अंगणवाड्या या कामांना प्राधान्य देत असल्याचे सीईओ संदिप कोहिनकर यांनी सांगितले.
जुनी पेन्शच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेला संप सोमवार 20 मार्चरोजी मागे घेण्यात आला. त्यानंतर मंगळवार 21 मार्चपासून पुन्हा कर्मचारी कामावर आले आहेत. मागील सहा दिवस संप असल्यामुळे कामे प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत शनीवार व रविवारीही जिल्हा परिषद सुरु ठेवण्यात येणार आहे.