सोलापूर : एकीकडे प्रशासन सहकार्य करीत नाही, सहकारी पदाधिकारी हेटाळणी करीत असल्याने राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत जि.प. अध्यक्षा आलेल्या असताना दुसरीकडे आचारसंहितेचे कारण पुढे करुन सर्वसाधारण सभा टाळली जात आहे. विशेष म्हणजे पुणे विभागातील अन्य जिल्हा परिषदांच्या सर्वसाधारण सभा मात्र होत आहेत. जिल्हा परिषदेच्या कारभारावर अध्यक्षाच समाधानी नसल्याचे त्यांनीच स्पष्ट केल्याने सोलापूर जिल्ह्यातील राष्टÑवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. प्रशासन सहकार्य करीत नसल्याने कामे होत नाहीत, कोणत्या विभागाचे काम समाधानकारक आहे ते सांगा?, असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांचा आहे. सहकारी पदाधिकार्यांच्या कारभारावरही त्यांनी तोफ डागली. याची खंत राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांना वाटली नाही. सर्वसामान्यांचे काम जिल्हा परिषदेत होत नसल्याचे व काही सभापतींकडून साहित्य खरेदीसाठी कशा प्रकारे अडवणूक केली जाते, हेही अध्यक्षा डॉ. माळी यांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हा परिषदेचे असे चित्र असताना सदस्यांकडून सभागृहात होणार्या हल्ल्याला सामोरे जाण्यापेक्षा सर्वसाधारण सभाच घेण्याचे टाळले जात आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा मार्च महिन्यात झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्वसाधारण सभा झाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर लागलीच पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळेही सोलापूर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. असे असताना पुणे विभागातील अन्य जिल्हा परिषदांनी मात्र सर्वसाधारण सभा व कामकाज सुरू केले आहे.
-----------------------------------------
पुणे विभागातील सोलापूर वगळता अन्य जिल्हा परिषदांनी आचारसंहिता असली तरी सर्वसाधारण सभा व अन्य सभा घेणे थांबविलेले नाही. सांगली जि.प.ची सर्वसाधारण सभा ९ मे रोजी, पुणे जि.प.ची १३ मे रोजी,कोल्हापूर जि.प.ची २७ मे रोजी झाली असून, सातारा जि.प.ची सर्वसाधारण सभा ११ जून रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले.
---------------------------------
पदाधिकार्यांना देणे-घेणे नाही ४लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अध्यक्षा डॉ. माळी दोन वेळा दालनात आल्या. उपाध्यक्ष एक दिवस तेही काही वेळेसाठी दालनात आले. समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी सभापती एखादा दिवस सोडला तर दालनात आले परंतु बैठका घेतल्या नाहीत. शिक्षण समितीचे सभापतीही एक-दोन वेळा काही वेळेसाठी दालनात बसले. एकत्रित बसून चांगल्या विषयावर चर्चा करावी, शासनाकडे येणार्या विषयांचा पाठपुरावा करावा, असे कोणालाही वाटले नाही.
----------------------------
आचारसंहितेमुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत असे सीईओंनी सांगितले. एखाद्या सदस्याने प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर दिल्याने आचारसंहिता भंग होण्याची शक्यता असल्याचे सीईओंनी सांगितल्याने सर्वसाधारण सभा रद्द केली. -डॉ. निशिगंधा माळी अध्यक्षा, जि.प. सोलापूर