विलास जळकोटकर
सोलापूर : भारत सध्या अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात आघाडीवर आहे. त्याचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील मुलांनी संशोधक व्हावे, यासाठी मोहोळ तालुक्यातील शेजबाभूळगावची झेडपी शाळा प्रयत्न करतेय. शाळेतील मुले दोन वर्षांपासून विज्ञानग्राम अंकोलीच्या मदतीने निवारा, पाणी, माती, ऊर्जा या विषयांवर संशोधन करत असून, भारताचे भावी संशोधक, शास्त्रज्ञ यातून तयार होतील, असा आशावाद व्यक्त केला जातोय.
साडेतीन हजार लोकवस्तीच्या शेजबाभूळगाव शाळेने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन परिसरात आपला ठसा उमटविला आहे. शाळा आयएसओ मानांकित आहे. युनेस्को स्कूल क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. वृक्षसंवर्धन व घनकचरा व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य केल्याचे शाळेचा परिसर पाहून लक्षात येते. सलग दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासातही शाळेनं बाजी मारली आहे.
व्हर्चुअल फिल्ड ट्रीप, विद्यार्थी सभा निवडणूक, डिजिटल क्लासरूम, व्हर्चुअल क्लासरूम असे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक उपक्रम शाळा राबवत आहे. शास्त्रीय संगीताच्या विविध सभांना मुले उपस्थित राहतात. शाळा व्यवस्थापन स्मिती अध्यक्ष अण्णासाहेब फडतरे, सरपंच गणपत पुदे यांच्या साथीनं मुख्याध्यापक बा.को. शिंदे, गौ.वि. म्हमाणे, पै.म. तांबोळी, अ.ता. पवार, यो.बा. इंगळे, न.अ. पवार, अ.ना. वसेकर, सु.आ. कोरे, रं.यो. इंगळे हे गुरुजन मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी सक्रिय असल्याचे दिसून आले. यासाठी शिक्षण विभाग अन् गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, केंद्रप्रमुख तिप्ण्णा कमळे यांच्या प्रेरणा असल्याचे गुरुजनांनी सांगितलं.
वैज्ञानिक प्रकल्पज्येष्ठ वैज्ञानिक अरुण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलांनी पाच हजार रुपयांत दोनशे चौरस फुटाचे घुमटाकार घर तयार केले. तसेच भारत, महाराष्ट्र, सोलापूरचे प्रत्येकी एक गुंठ्याचे उठावाचे नकाशे बनविले. भूकंपरोधक घर, अग्निप्रतिबंधक झोपडी, ऊर्जाबचतीचे प्रयोग, ग्रो युवर क्लासरूम हे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे मोठे प्रकल्प विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आहेत.
इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात ज्यांचे पाठ आहेत, अशा मराठीतील ख्यातनाम साहित्यिक ‘एक होता कार्व्हर’च्या लेखिका वीणा गवाणकर व बालसाहित्यिक फारूक काझी यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या विज्ञान प्रकल्पांची गतवर्षी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. त्यांच्या प्रकल्पांचे कौतुक केले.
मुलांना विज्ञान व पर्यावरण शिक्षण देण्यासाठी प्रत्येक आठवड्यातून एक दिवस विज्ञानग्रामच्या सहकार्याने वर्षभर विविध प्रकल्प पूर्ण केले जात आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी, कृषी महाविद्यालयात मिळणारे शिक्षण शाळकरी वयातच देण्यावर आम्ही प्रामुख्याने भर देत आहोत. - बाबासाहेब शिंदे, मुख्याध्यापिका
शाळेतील नेहमीच्या चार भिंतींमधल्या शिक्षणाबरोबर बिनभिंतींच्या शाळेचा शिक्षकांचा प्रयोग आमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढच्या वाटचालीसाठी मोलाचा ठरणारा आहे.- संतोषकुमार गवळी, पालक