दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक व काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम करताना अनेक शिक्षकांनाही त्याची बाधा झाली आहे. यामुळे काही शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांनाही बाधा होऊन काहींना प्राण गमवावा लागला आहे.
त्यामुळे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो या भावनेने तालुक्यातील झेडपीच्या शिक्षकांनी स्वतःहून पुढाकार घेत हा निधी संकलित केला. यासाठी व्हाॅटस्ॲप ग्रुपचा वापर केला. त्यास सर्व शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
माढा तालुक्यामध्ये प्राथमिक विभागाचे जवळपास ९५० शिक्षक संख्या आहेत, तसेच त्या केंद्रातील माध्यमिक शिक्षकांनाही आवाहन केले असून, त्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देत पैसे जमा करण्यास सुरुवात केली. या कामी सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची एक समन्वय समितीही स्थापन केली आहे. प्रारंभी जमा झालेल्या निधीतून कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर अथवा इतर गरजेच्या वस्तू घेण्याविषयी सोशल मीडियावर चर्चा झाल्या. मात्र, नंतर शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, गटविकास अधिकारी डाॅ. संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. शिवाजी थोरात यांची एक ऑनलाइन बैठक पार पडली. यामध्ये तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक ती ठोस मदत करण्याच्या दृष्टीने सर्व निधी एकत्र करून आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार लवकरच संपूर्ण १० लाखांचा निधी जमा होताच हा निधी दिला जाणार आहे.
शिक्षकांची सामाजिक बांधिलकी : गटशिक्षणाधिकारी
माढा तालुक्यातील सर्व शिक्षकांनी हा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला आहे. सध्याच्या या परिस्थितीत शिक्षकांनी दाखविलेली ही सामाजिक बांधिलकी शिक्षण विभागासाठी कौतुकास्पद आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्या सर्वसामान्य रुग्णांपर्यंत ही मदत पोहोचावी आणि त्यांना याचा फायदा व्हावा. याच उद्देशाने मदत करण्याचे नियोजन केले जात असल्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी सांगितले.
कोट ::::::
माढा तालुक्यातील सर्व शिक्षकांनी कोरोनाच्या महामारीत स्वयंप्रेरणेने उचललेले हे मदतीचे पाऊल नक्कीच आम्हाला अभिमानास्पद आहे. त्यांनी केलेली मदत ही नक्कीच आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जाईल. त्यातून अनेक रुग्णांना आधार मिळेल.
- डॉ. संताजी पाटील
गटविकास अधिकारी, कुर्डूवाडी.