सोलापूर : ग्रामीण भागातील दुर्धर आजाराने पीडित असलेल्या लोकांना औषधोपचार खर्चासाठी मदत म्हणून देण्यात येणाऱ्या १५ हजारांसाठी कोरोना काळातही ४२ जणांचे प्रस्ताव आले. त्यापैकी केवळ २२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामीण भागातील नागरिकांना औषधोपचारासाठी पंधरा हजारांची आर्थिक मदत देण्यात येते. हृदयरोग, किडनी आणि कॅन्सर या तीन आजारासाठीच ही मदत आहे. पण ही मदत घेण्यासाठी उत्पन्नाची अट असून, रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलचे कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. झेडपीच्या सेस फंडातून यासाठी चालूवर्षी २० लाख उपलब्ध केले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात मदत मागण्यासाठी ४२ अर्ज आले, त्यातील २२ अर्ज मंजूर करून लाभार्थींच्या खात्यावर ३ लाख ३० हजार जमा करण्यात आल्याचे कक्ष अधिकारी निटोरे यांनी सांगितले.
मागीलवर्षी २३६ जणांना लाभ
गतवर्षी ३२७ जणांनी अर्ज केले होते. यातील २३६ प्रस्ताव मंजूर केले. ९१ प्रस्ताव फेटाळण्यात आले. यासाठी ७० लाख निधी असताना निम्मा म्हणजे ३५ लाख ४० हजार निधी खर्च झाला. पैसे असूनही जाचक अटीमुळे खर्ची पडत नसल्याने प्रस्तावाची गरज पाहून अर्ज मंजूर करावा असा सदस्यांचा आग्रह आहे.
यामुळे प्रस्ताव अपात्र
१५ हजारांची मदत मागण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र व सदस्याची शिफारशीसह ८ दाखले जोडावे लागतात. शासनमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार न घेणे,योजनेतील आजार नसणे, दुबार लाभ, शहरी भागात वास्तव्य, कागदपत्र अपूर्ण यामुळे प्रस्ताव फेटाळले जातात.