टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबलटेनिसपटू भाविना पटेल हिला Class 4 च्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी झाला आहे.
आज झालेल्या Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर 3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. दरम्यान, पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी भाविना पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
तेरा वर्षांपूर्वी भाविनाने अहमदाबाद शहरातल्या वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. भाविना व्हीलचेअरवर बसून खेळते. बाराव्या वर्षी तिला पोलिओ असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराने खचून न जाता भविनाने दमदार वाटचाल केली आहे.
2011 मध्ये भाविनाने थायलंड इथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली होती. 2013मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भाविनाने रौप्यपदक पटकावले होते.
भाविनाने जॉर्डन, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इंडोनेशिया, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन, नेदरलॅण्डस, इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने भाग घेतला, पदकं मिळवली. पण सुवर्ण पदक मात्र कायम तिला हुलकावणी देत राहिले.