- मनवीर सिंगनवी दिल्ली : २०२० मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यावरच आपला संपूर्ण भर असेल, असे भारतची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने आज सांगितले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ती बोलत होती.मनिका जगातील ५८ व्या क्रमांकाची उत्कृष्ट टेबल टेनिसपटू आहे. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि अशियाई खेळांमध्ये तिने पाच पदके जिंकली आहेत. दिल्लीकर असलेल्या मनिकाचे मुख्य लक्ष्य जागतिक रँकिंगमध्ये सर्वोच्च खेळाडूंमध्ये स्वत:ची जागा निर्माण करण्याचे आहे. ती म्हणाली, ‘गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल आणि अशियाई स्पर्धांमध्ये मी पदक पटकाविले. जगातील चौथ्या व २० व्या क्रमांकाच्या खेळाडूंना हरविल्यामुळे माझे मनोबल वाढले आहे.’ चीनच्या खेळाडूंना हरविणे यापूर्वी सर्वात अवघड होते. पण आता त्यांच्याशी पाय रोवून सामना केला जातो. त्यांना हरविण्याची क्षमता निर्माण झाली आहे, असे मनिका हिने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.मनिकाने चार वर्षांची असतानाच टेटे खेळण्यास सुरुवात केली. तिची मोठी बहीण आंचल व मोठा भाऊ साहिल हेही टेटे खेळतात. राज्यस्तरीय ८ वर्षांखालील स्पर्धा जिंकल्यानंतर तिने संदीप गुप्ता यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.>प्रशिक्षकाला वगळल्याने नाराज‘अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, प्रशिक्षक संदीप गुप्ता यांना द्रोणाचार्य पुरस्कारातून वगळण्यात आल्याबद्दल नाराजही आहे,’ असे मनिकाने सांगितले. २३ वर्षांच्या मनिकाने गुप्ता यांना पुरस्कार मिळायला हवा होता, असे सांगून पुढच्यावेळी प्रशिक्षकाला पुरस्कार मिळेल, अशीच कामगिरी करणार असल्याचा शब्द दिला. प्रशिक्षक गुप्ता म्हणाले, ‘योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळत असेल तर माझा आक्षेप नाही. दरवर्षी द्रोणाचार्य पुरस्कार माझ्यासाठी डोकेदुखी ठरतो. अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या मागे प्रशिक्षकाची किती कठोर मेहनत असते, हे समजून घेण्याची गरज आहे.’
आगामी टोकियो आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित- मनिका बत्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 1:38 AM