मस्कत : भारताचा अनुभवी आणि स्टार टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याने रविवारी येथे शानदार कामगिरी करताना आयटीटीएफ चँलेजर प्लस ओमान ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात त्याने पोर्तुगालच्या अग्रमानांकीत मार्कोस फ्रेटास याला सहा सेटमध्ये नमविले.विशेष म्हणजे तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शरथने पहिल्यांदाच आयटीटीएफ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलेल्या शरथने मार्कोसला ६-११, ११-८, १२-१०, ११-९, ३-११, १७-१५ असा धक्का दिला. याआधी२०१० साली शरथने इजिप्तओपन स्पर्धा जिंकली होती. यानंतर त्याने २०११ साली मोरोक्को ओपन आणि २०१७ साली इंडिया ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडकमारली होती.उपांत्य सामन्यातही चौथ्या मानांकित शरथ याने सलग दोन गेम गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले होते. त्याने तब्बल सात सेटमध्ये रंगलेल्या अटीतटीच्या उपांत्य फेरीत रशियाच्या किरिल स्काचकोव्ह याचा ११-१३, ११-१३, १३-११, ११-९, १३-११, ८-११,११-७ असा पराभव केला.त्याचवेळी, फ्रेटास याने भारताच्याच हरमीत देसाई याला ५-११, ११-९, ६-११, ११-८, १३-११, ११-३ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. (वृत्तसंस्था)येथे खेळलेल्या स्पर्धेनंतर माझे रँकिंग सुधारण्यात मदत मिळेल. विशेषत: आशियाई आणि आॅलिम्पिक पात्रतेसाठी हे महत्त्वाचे होते. या स्पर्धेत सर्व भारतीय खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता, कारण आम्हाला टोकियो आॅलिम्पिकमध्ये जागा मिळवायची आहे.- शरथ कमल
ओमान ओपन टेबल टेनिस; शरथ कमलने राखला दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 4:11 AM